पाणी नाही, मात्र कालव्यांचे काम सुरूच
By admin | Published: April 9, 2015 01:00 AM2015-04-09T01:00:17+5:302015-04-09T01:00:17+5:30
भागातील लोक मुख्यत्वे शेती व्यवसाय करतात. पण त्यांना उन्हाळी धानपिक घेण्यासाठी पाणीच मिळत नाही.
बाराभाटी : भागातील लोक मुख्यत्वे शेती व्यवसाय करतात. पण त्यांना उन्हाळी धानपिक घेण्यासाठी पाणीच मिळत नाही. मात्र खाजगी ठेकेदारांना किंवा शासकीय ठेकेदारांना काम देवून सदर विभागामार्फत कालव्यांची कामे मात्र केल्या जात आहे.
तलावांच्या या जिल्ह्यात जवळच नवेगावबांध, गोठणगाव हे पाण्याचे ठिकाण असल्याने यांच्या भरवशावर उन्हाळी, पावसाळी धान पिके व इतर पिके घेतली जातात. सदर तलावामुळे पाण्याचा पुरवठा होतो. परंतु यावर्षी धान पिकाला पाणी नाही. मात्र ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी कालव्यांचे बांधकाम करण्यासाठी सिमेंटचे बासिंग आणि काँक्रीटचे कंकण बांधल्या जात आहे. पण अर्धपोटी राहणाऱ्या शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.
नवेगावबांध येथील पाटबंधारे विभागाच्या सहायक अभियंता कार्यालयाकडून बाराभाटीपर्यंत कधीच पाणी पोहोचले नाही असा इतिहास आहे. मात्र ही व्यथा कोणीच समजून घेत नाही.
परिसरामध्ये नवेगावबांधचे पाणी पोहोचत नाही, पण नवेगावबांध कार्यालयाकडून नहराचे काम बाराभाटी, येरंडी, चापटी, पिंपळगाव, खांबी मोठा, कालवा आणि कुंभीटोला, सुकळी, खैरी लहान कालव्यांचे बांधकाम खासगी आणि शासकीय ठेकेदारांकडून टक्केवारीने होत आहे.
शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांसाठी भरपूर प्रमाणात पाणी मिळेल, अशा खोट्या प्रचाराला शेतमजूर, शेतकरी बळी पडत आहेत. परंतू त्यांच्या वाट्याला समृद्धीचे जीवन येताना दिसत नाही. (वार्ताहर)