रब्बीसाठी पाणी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 09:35 PM2017-11-05T21:35:24+5:302017-11-05T21:35:34+5:30
यंदा पावसाने दिलेल्या दग्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण नियोजनच फिस्टकले आहे. कमी पावसामुळे प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा उपलब्ध असून अशात रब्बीसाठी पाणी दिल्यास येणारा काळ कठीण जाणार आहे.
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा पावसाने दिलेल्या दग्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण नियोजनच फिस्टकले आहे. कमी पावसामुळे प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा उपलब्ध असून अशात रब्बीसाठी पाणी दिल्यास येणारा काळ कठीण जाणार आहे. यामुळेच प्रकल्पांतील पाण्याचे पिण्यासाठी आरक्षण करण्यात आले असून यंदा रब्बीसाठी पाणी दिले जाणार नाही. यावरून जिल्ह्यात रब्बीचा हंगाम धोक्यात दिसत आहे.
जिल्ह्याला धानाचे कोठार अशी साजूक उपमा देण्यात आली आहे. वास्तविक प्रमुख पीकही धानच आहे. मात्र बदलत्या काळानुरूप निसर्गाचा लहरीपणा वाढला असून धानाच्या या कोठारात आता धानालाच ग्रहण लागू लागले आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण घटत चालले असून शेतीला फटका बसतच चालला आहे. परिणामी शेतकरी दारिद्रयात झोकला जात असतानाच धानाचे उत्पादनही घटत चालले आहे. यात धानच काय सर्वच शेती नेस्तनाबूत होऊ लागल्याचे भकास वास्तव आज जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.
शेतकरी आपल्या रक्ताचे पाणी करून शेती करीत आहेत. मात्र पाऊस आपला रंग दाखवून त्यांचे जीवन बेरंग करीत आहे.
परिणामी शेती महागडी होऊ लागली असून शेतकºयांचा निसर्गावरील भरवसा उठू लागला आहे. खरिपातही पावसाने आपला रंग दाखविला. त्यात पाटबंधारे विभागाने सिंचनाची सोय करून दिल्याने कितीतरी शेतकºयांचे पीक बचावले. पाटबंधारे विभागच देव बनून शेतकºयांसाठी धावून आल्याचे दिसून आले व नेहमी विभागाकडून सिंचनाची सोय केली जाते. याचेच फलीत आहे की, जिल्ह्यातील शेतकरी आजही पावसाच्या लहरीपणावर नव्हे तर पाटबंधारे विभागाच्या भरवशावर आपली शेती करीत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
यात रब्बीचा हंगाम तर पूर्णपणे पाटंबधारे विभागावरच अवलंबून असतो असे म्हणता येईल. यंदा मात्र पावसाने दगा दिल्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठी बघून पाटबंधारे विभाग शेतीला पाणी देण्यातबाबत हतबल दिसून येत आहे.
प्रकल्पांतील पाणीसाठा बघता भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेत जिल्हाधिकाºयांनी पाणी पिण्यासाठी आरक्षीत करून सिंचनासाठी देण्यास मनाई केल्याचे आदेश काढले आहेत. यामुळे मात्र जिल्ह्यातील रब्बीचा हंगाम यंदा धोक्यातच दिसून येत आहे.
बाघ प्रकल्पातून मदत नाही
बाघ प्रकल्पांतर्गत सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड प्रकल्प येतात. यातील सिरपूर व कालीसराड प्रकल्पांतील पाणी पुजारीटोला प्रकल्पाला दिले जाते. त्यानंतर पुजारीटोला प्रकल्पाच्या कालव्यांतून पाणी सोडले जाते. यात जिल्ह्यासह मध्यप्रदेश राज्यातही सिंचनाची सोय केली जाते. दरवर्षी १ जुलै ते ३१ आॅक्टोबर हा खरिपाचा हंगाम समजला जात असून ३१ आॅक्टोबर रोजी प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा बघून पुढचे नियोजन केले जाते. सध्या मात्र पुजारीटोला प्रकल्पात फक्त २५ टक्के पाणीसाठा आहे. पाणी कमी प्रमाणात असल्याने त्यातही रब्बीसाठी पाणी दिल्यास भविष्यात पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार. हे लक्षात घेत जिल्हाधिकाºयांनी पाणीसाठा येत्या ३० जून २०१८ पर्यंत पिण्यासाठी आरक्षित केला असल्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पुजारीटोला प्रकल्पातून यंदा रब्बीसाठी पाणी दिले जाणार नाही.
इटियाडोहचा विषय पाणी वापर संस्थांकडे
सन २००५ च्या कायद्यानुसार प्रकल्पांतील पाण्याचा वापर कसा करावा यासाठी पाणी वापर संस्थांचे गठन करायचे आहे. त्यानुसार, इटियाडोह प्रकल्पासाठी ५५ पाणी वापर संस्था आहेत. इटियाडोह प्रकल्पातून खरिपात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या दोन तालुक्यांना, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याला तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्याला सिंचन केले जाते. सध्या प्रकल्पात १०८.९८ दलघमी (३४ टक्के) पाणीसाठा आहे. यातील ४ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षीत असल्याने उर्वरीत १०४ दलघमी पाणी रब्बीसाठी घ्यायचे की नाही हा निर्णय पाणी वापर समितीचे अध्यक्ष ठरवणार आहेत. अद्याप त्यांची बैठक झालेली नसल्याने इटियाडोह प्रकल्पाची स्थिती स्पष्ट झालेली नाही.