शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:21 AM2018-12-08T00:21:44+5:302018-12-08T00:23:12+5:30
मानवी जीवनाचा सर्वागीण विकास हा त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो. शिक्षणाने संस्कार व मुल्यांची जडणघडण होते. माणसामध्ये जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : मानवी जीवनाचा सर्वागीण विकास हा त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो. शिक्षणाने संस्कार व मुल्यांची जडणघडण होते. माणसामध्ये जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे. एकविसाव्या शतकातही आपल्याला कायद्याचा बडगा उगारुन शिक्षणाचे महत्व सांगावे लागते ही खरी शोकांतिका आहे. शिक्षणाचे खरे महत्व समाजात रुजलेच नाही, यासाठी समाजच कारणीभूत असल्याचे प्रतिपादन मनोहर चंद्रीकापुरे यांनी केले.
माहुरकुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित आदिवासी जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे होते. उद्घाटन जि.प.सदस्य गिरीश पालीवाल यांनी केले.
या वेळी मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, बी.एस.सयाम, जि.प.सदस्य मंदा कुंभरे, चेतन उईके, कविता उईके, एस. आर. वाळवे, बाबुराव काटंगे, डॉ. नाजुक कुंभरे उपस्थित होते.
चंद्रिकापुरे म्हणाले, ज्याप्रमाणे अनुसूचित जातीचे बांधव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून शिक्षणाला महत्व देतात त्याप्रमाणे आदिवासी बांधवानी जननायक बिरसा मुंडा यांना आदर्श मानून शैक्षणिक क्रांती केली पाहिजे. शिक्षण असेल तर त्याचा कुठेही उपयोग करुन घेता येतो. गरीबी वाट्याला येत नाही. आदिवासी बांधवानी उच्च शिक्षण घेऊन भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा लाभ घ्यावा, आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा व जीवन सुखकर करावे असे मत व्यक्त केले.
बी.एस.सयाम म्हणाले, जल, जंगल व जमिनीवर पूर्वीच्या काळी आदिवासींचीच सत्ता होती. हे ऐश्वर्य व आदिवासींचे हक्क अबाधित राखण्यासाठी बिरसा मुंडा यांनी लढा दिला. मात्र वर्तमान स्थितीत आदिवासींना जंगलातही राहता येत नाही व शहरातही वास्तव्य करता येत नाही अशी बिकट अवस्था आदिवासींची झाली आहे. जंगलाचा मालक असूनही आदिवासींनी कधीच त्याचा वापर केला नाही.आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणीव नाही. अपूरे शिक्षण हे त्यांच्या दारिद्रयाचे मूळ आहे. त्यामुळे व्यसनाधिनतेचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगीतले.
याप्रसंगी भागवत नाकाडे, गिरीश पालीवाल यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सुनिता कोकोडे यांनी केले तर आभार नेतराम मलगाम यांनी मानले.