जाळण्यासाठी लाकडं नाहीत म्हणून मृतदेहच वन कार्यालयात आणला; गोंदिया जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:39 PM2020-06-10T12:39:40+5:302020-06-10T12:40:18+5:30
विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मृतदेह जाळण्यासाठी वन विभागाच्या आगारात लाकूड उपलब्ध नाही.शहरात पर्यायी सुविधा नाही.विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला.
अर्जुनी मोरगाव येथील नरेश तरजुले या युवकाचे निधन झाले. त्याचेवर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार होते. स्थानिक स्मशानभूमीत विद्युत शव दाहिनीची सुविधा नाही. वन आगारातून लाकडे विकत घेऊनच प्रेत जाळली जातात. आप्तेष्टांनी वन कार्यालय गाठले. मात्र तिथे कित्येक महिन्यांपासून लाकडेच नाहीत. गावात लाकूड मिळण्याची दुसरी व्यवस्था नाही. आता प्रेताचे करायचे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चार चाकी वाहनांतून चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे यांचेशी चर्चा केली. त्यांनी आपल्या आगारात साठा नसल्याचे सांगितले.नवेगावबांधच्या आगारातून आणण्याचा सल्ला दिला. १५ कि.मी.अंतरावर एखादे वाहन घेऊन जाणे सामान्यांना आर्थिकदृष्टया परवडण्यासारखे नाही. मृतक हा अगदी सामान्य कुटुंबातला होता. दबाव वाढतच होता. ही बाब आ.मनोहर चंद्रिकापुरे यांचे निदर्शनास आणून दिली. त्यांनी सुद्धा उपवनसंरक्षक युवराज यांना भ्रमणध्वनीवर कळविली. अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे, क्षेत्र सहाय्यक गोटेफोडे यांनी मृतकाच्या नातेवाईकांना वन आगारात येण्यास सांगितले. इकडून-तिकडून प्रेत जाळण्यापूरते लाकूड उपलब्ध करून देण्यात आले. मृतकाच्या कुटुंबियांना लाकूड उपलब्ध करून देण्यासाठी आर.के.जांभुळकर, त्रिशरण शहारे यांनी प्रयत्न केले. या वेळी मृतकाचे वडील पुरुषोत्तम तरजुले, विनोद शहारे, विक्की लांडे, अजय बडोले, रुपलाल बनकर, खुमदेव शहारे उपस्थित होते. अर्जुनी मोरगावच्या वन आगारात प्रेत जाळण्यासाठी लाकूड नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
मागणी नोंदविली आहे
प्रेताच्या अंत्यविधीसाठी लाकूड ठेवले जाते. हा साठा संपलेला आहे. वन आगारात अजिबात लाकूड नाही. आगामी काळात ही समस्या उग्र रूप धारण करू नये यासाठी आपल्या विभागाकडे मागणी नोंदविली आहे. मात्र अजूनही लाकडे उपलब्ध झाली नाहीत अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे यांनी दिली.
महामारीत लाकडांचा दुष्काळ
देशात सर्वत्र कोरोना विषाणूंचा संसर्ग सुरू आहे. महामारी घोषित करण्यात आली. महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढतच आहे. तालुक्यात ३२ जण बाधित आढळून आले. या पार्श्वभूमीवर प्रेत जाळण्यासाठी वन आगारात लाकूड उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब आहे. वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी हे गांभीर्याने घेत नाही. नवेगावबांधच्या आगारातून लाकूड आणणे सर्वसामान्यांना शक्य होत नाही.तातडीने वन विभागाने उपाययोजना करावी अन्यथा यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आर.के.जांभुळकर यांनी दिला आहे.