महिला सरपंचावरील अविश्वास बारगळला
By admin | Published: September 23, 2016 02:06 AM2016-09-23T02:06:52+5:302016-09-23T02:06:52+5:30
देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिल्हाटी ग्रामपंचायतमधील महिला सरपंच ईमलाबाई बडाबाग यांच्यावर पाच सदस्यांनी आणलेला
गोंदिया : देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिल्हाटी ग्रामपंचायतमधील महिला सरपंच ईमलाबाई बडाबाग यांच्यावर पाच सदस्यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव तहसीलदार संजय नागतिलक यांनी निरस्त केला.
विशेष म्हणजे नऊ सदस्यसंख्या असलेल्या चिल्हाटी ग्रामपंचायतमध्ये दोन सदस्यांची पदे रिक्त आहेत. ग्रामपंचायत अधिनियमानुसार, महिला सरपंचावर अविश्वास आणण्याकरिता तीन चतुर्थांश सदस्यसंख्या असणे अनिवार्य आहे. परंतु अविश्वास आणणारे केवळ पाचच सदस्य असल्याने व नियमानुसार आवश्यक सहा सदस्यांची गरज असल्याने अविश्वास बारगळला.
तहसीलदार संजय नागतिलक यांनी ग्रा.पं.च्या पाच सदस्यांच्या अविश्वास अर्जावर २० सप्टेंबर मंगळवारला सभा बोलविली. या सभेत केवळ पाच सदस्यांनी मतदान केल्याने अविश्वास पारित होऊ शकला नाही. त्यामुळे सरपंच ईमला बडाबाग यथावत आपल्या पदावर राहणार आहेत.
ग्रामसेवक एम.एम. कोवे यांनी सरपंच ईमबलाबाई यांची खोटी स्वाक्षरी करुन तीन लाख रुपयांची उचल १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केल्याचे बोलले जाते. मात्र हा ठपका ठेवून पाच सदस्यांनी सरपंचावर खोटे आरोप लावून अविश्वास आणण्याचे ठरविले होते. परंतु अविश्वास बारगळला. या ग्रामपंचायतमध्ये तीन लाख रुपये गहाळ करणाऱ्या ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई केव्हा होणार? असा सवाल केला जात आहे . (तालुका प्रतिनिधी)