उभ्या मालगाडीतून होते कोळशाची सर्रास चोरी
By admin | Published: October 10, 2015 02:12 AM2015-10-10T02:12:30+5:302015-10-10T02:12:30+5:30
मुंबई-हावडा या मुख्य रेल्वेमार्गावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात छोटे-मोठे १२ रेल्वे स्थानक आहेत.
चोरट्यांशी संगनमत? : रेल्वे सुरक्षा दलाकडून थातूरमातूर कारवाई
देवानंद शहारे गोंदिया
मुंबई-हावडा या मुख्य रेल्वेमार्गावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात छोटे-मोठे १२ रेल्वे स्थानक आहेत. या स्थानकांवर दररोज थांबणाऱ्या कोळशाच्या मालगाड्यांमधून कोळशाची खुलेआमपणे चोरी होत आहे. मात्र रेल्वे सुरक्षा दलाकडून त्या चोरट्यांवर कारवाई होत नसल्यामुळे त्यांच्याशी रेल्वे पोलिसांचे संगनमत असल्याची शंका घेतली जात आहे.
मुख्य रेल्वे मार्गावरील बहुतांश रेल्वे स्थानकावर दररोज कोळशाच्या मालगाड्या थांबत असतात. गाडी थांबताच संधी पाहून काही चोरटे डब्यावर चढतात आणि पटापट त्यातील दगडी कोळसा खाली फेकतात. या चोरट्यांना कोणी प्रवाशांनी पाहिले किंवा त्यांच्याबद्दल कोणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली तर रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) कर्मचारी त्या चोरट्यांना पकडतात व थातूरमातूर कारवाई दाखवून नंतर सोडून देतात. या प्रकारामुळे मालगाड्यांमधून दगडी कोळशाची चोरी होण्याचे प्रकार वाढत आहे.
शुक्रवारी (दि.९) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास तिरोडा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दगडी कोळशाने भरलेली मालगाडी थांबलेली होती. त्या गाडीच्या डब्यावर दोन इसम चढून भराभर दगडी कोळसा खाली फेकत होते. या प्रकाराकडे तेथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष गेले. मात्र रेल्वेचे कर्मचारी या घटनेपासून अनभिज्ञच होते. एका रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला ही बाब समजली. तो घटनास्थळी पोहोचताच एका चोरट्याने पळ काढला. मात्र दुसऱ्याला पकडण्यात आरपीएफला यश आले. मात्र जणूकाही घडलेच नाही असे दाखवत नंतर त्याला सोडून देण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी आपल्या डोळ्यासमोर कोळशाची चोरी होताना पाहीले आहे. दोन व्यक्ती मालगाडीवर चढून भराभर दगडी कोळसा खाली फेकत होते. तरीही आरपीएफ चोरट्यांना पकडून कोणतीही कारवाई न करता सोडून देतात, ही बाब बरेच काही सांगून जाते. (प्रतिनिधी)
१२ स्थानके, ५० पेक्षा जास्त गाड्या
मुंबई-हावडा मार्गावर नागपूर-रायपूर या दरम्यान गोंदिया हे मुख्य रेल्वे स्थानक आहे. यासोबतच गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीत याच मार्गावर मुंडीकोटा, तिरोडा, काचेवानी, गंगाझरी, गोंदिया, गुदमा, आमगाव, धानोली, सालेकसा, दरेकसा, बोरतलाव व दरेकसा असे १२ स्थानकं आहेत. त्या स्थानकापैकी कोणत्याही स्थानकावर मालगाड्या थांबू शकतात. दररोज कोळशाचा किमान ५० गाड्या तरी या स्थानकांवरून जातात. कोळसाचोर आता कोणकोणत्या स्थानकांवर सक्रिय आहेत याचा शोध घेतल्यास शासनाची बरीच मालमत्ता चोरी जाण्यापासून वाचू शकते.
सुरक्षा कर्मचारी म्हणतात, ही मोठी बाब नाही!
या प्रकाराबाबत गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाचे इन्चार्ज बी.एन. सिंग यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, कोळशाने भरलेली मालगाडी सदर स्थानकावर थांबलेली असताना एक व्यक्ती एका पोत्यामध्ये गाडीखाली पडलेली कोळशाची चुरी उचलून जमा करीत होता. ही फारशी मोठी बाब नाही, मात्र तरी त्याला रेल्वे अॅक्टनुसार ताब्यात घेण्यात आले आहे, परंतु गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. वास्तविक मालगाडीतून कोळसा बाहेर काढल्याशिवाय खाली पडत नाही. मात्र पोलीस ज्या पद्धतीने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करतात त्यावरून त्यांचे आणि कोळसा चोरांचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट होत आहे.