ग्रामीण रूग्णालयात पाणी पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:25 PM2018-06-18T22:25:26+5:302018-06-18T22:25:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : येथील ग्रामीण रूग्णालयातील मोटारपंप नादुरूस्त झाल्यामुळे रूग्णालयात पाणी पेटले होते. तीन दिवस पाणी मिळू न शकल्यामुळे येथील रूग्ण, त्यांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांचीही चांगलीच फजिती झाली. अखेर ग्रामपंचायतच्या पुढाकाराने नवीन मोटारपंप बसविण्यात आल्यावर पाण्याची समस्या सुटली.
रूग्णालयातील बोअरवेलवर बसविण्यात आलेला मोटारपंप नादुरूस्त झाल्यामुळे ९ तारखेपासून रूग्णालयातील पाणी पुरवठा बंद होता. पाणी नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ग्रामीण रुग्णालयाला लागून असलेल्या वसाहतीत पाण्यासाठी भटंकती करावी लागली. पिण्याचे पाणी नसल्याने तसेच प्रसाधन गृहातही पाणी नसल्यामुळे रुग्णांना भरती करण्यात आले नाही. यामुळे काहींनी घरची वाट धरली तर काहींनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली. काही रुग्णांना गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यामुळे कारण नसतांनाही सामान्य रुग्णालय गोंदिया, भंडारा येथे जावे लागले. त्यामुळे रुग्णांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागले.
याबाबत, येथील कर्मचाऱ्यांनी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सतीश कोसरकर यांना १३ जून रोजी याबाबत माहिती दिली. कोसरकर यांनी लगेच रुग्णसेवा समितीचे सदस्य तथा उपसरपंच रघुनाथ लांजेवार यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच इलेक्ट्रीशियनला बोलावून दुरुस्तीसाठी प्रयत्न केले मात्र मोटारच नादुरुस्त असल्याचे समजले.
याबाबत प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. भावेश गुल्हाने यांनी सरपंच अनिरुद्ध शहारे यांना याबाबतची माहिती दिल्यावर त्यांनी रूग्णालयात धाव घेतली. पाण्याअभावी रुग्णाचे व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय बघून पाण्याच्या कॅनची व्यवस्था करुन दिली.
विशेष म्हणजे, १२ हजार रुपये वार्षीक प्रमाणे रुग्णालयाने इलेक्ट्रीशियनची नियुक्ती केली आहे. परंतु बोअरवेलची मोटारच नादुरुस्त आहे हे त्याच्या लक्षात येऊ नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष व पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जमईवार यांना दिली व त्यांच्या सल्ल्यावरून ग्रामपंचायतने मोटार व पाईप विकत घेऊन दिल्यानंतर १३ जून रोजी रात्री ग्रामीण रुग्णालयात पाणी पुरवठा सुरु झाला.
प्रभारींच्या भरवशावर चालत आहे कारभार
गेल्या ६-७ वर्षापासून या रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कुलूप बंद आंदोलनाचा इशारा व गावकऱ्यांनी अनेकदा मागणी केली. ग्रामपंचायतनेही निवेदन दिले होते. परंतु पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या मतदार संघातील या रुग्णालयात ही रिक्त पदे भरण्यात आली नाही. आयुषचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू कापगते व डॉ. लोथे या रुग्णालयाचा कारभार आपल्या खांद्यावर वाहत आहेत. ग्रामीण भागातील ११ महिन्यांची अट असल्यामुळे तीन वैद्यकीय अधिकारी येथे सध्या कार्यरत आहेत. त्यापैकी एकाची जुलै महिन्यात, नंतर दोन महिन्यानंतर दुसºयाची व चार महिन्यांनी तिसऱ्याची मुदत संपत आहे. अन पुन्हा या ग्रामीण रुग्णालयांचा भार डॉ. कापगते व डॉ. लोथे या आयुषच्या अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांच्या खांदावर येणार असल्याचे दिसत आहे.
रुग्णालयात पाणी पुरवठा होत नसल्याची माहिती मिळताच कॅनद्वारे रुग्णालयात पाणी पुरवठा ग्रामपंचायतने त्वरित केला. शिवाय मोटार व पाईपची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी यासाठी आपण पालकमंत्र्यांना लवकरच भेटणार आहोत.
-अनिरुद्ध शहारे
सरपंच, नवेगावबांध
ग्रामीण रुग्णालयाच्या पाणीपुरवठा ठप्प झाल्याची माहिती मिळताच मी स्वत:च्या शेतातील मजूर व इलेक्ट्रिशियन घेऊन मोटार दुरुस्तीसाठी प्रयत्न केले. पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नसल्याने अशा समस्या उद्भवणार व त्यावर विनाविलंब तोडगा काढता येत नाही. ग्रामपंचायच्या सहकार्याने नवीन मोटार बसवून पाणी पुरवठा पूर्णवत करण्यात आला.
-सतीश कोसरकर
सदस्य, रुग्ण सेवा समिती, ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध