एका जागेमागे १० उमेदवारांची होणार लेखी परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 05:51 PM2024-07-11T17:51:18+5:302024-07-11T17:51:59+5:30
११०० उमेदवारांची निवड : १५ जुलैला होणार लेखी परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई संवर्गात रिक्त असलेल्या एकूण ११० पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत एका जागेसाठी १० उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे. यासाठी ११० जागा गोंदिया जिल्ह्यात असून, यासाठी ११०० उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसाठी करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ११० जागांसाठी १९ जून ते ५ जुलै २०२४ पर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्या आधारे महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवा प्रवेश) नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील नियम ४ (२) नुसार शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी निवड यादी पोलिस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथील नोटीस बोर्डावर तसेच गोंदिया जिल्हा पोलिस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली.
आक्षेप नोंदविण्याचा आज शेवटचा दिवस
लेखी परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीत कुणाला हरकती / आक्षेप असल्यास त्यांनी पोलिस अधीक्षक गोंदिया यांच्या कार्यालयाचे ई-मेल sp.gondia@mahapolice.gov.in यावर लेखी स्वरुपात ११ जुलैच्या रात्री ८ वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप कारणांसह नोंद करावे. त्यानंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, असे पोलिस विभागाने कळविले आहे.
फुलचूरच्या आयटीआय येथे होणार लेखी परीक्षा
११० पदांसाठी होणाऱ्या पोलिस भरतीची लेखी परीक्षा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), फुलचूर पेठ, गोंदिया येथे १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी हॉल तिकिटासह लेखी परीक्षेकरिता दुपारी १:३० वाजता प्रत्यक्ष हजर राहावे, असे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी कळविले आहे.