काम करणाऱ्यांची पक्षात किंमत होईल, गटबाजी चालणार नाही ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:59+5:302021-09-08T04:34:59+5:30
सडक-अर्जुनी : स्वातंत्र्यापासून देशाच्या बांधणीसाठी काँग्रेस पक्षाने रक्त सांडविले असून, केंद्रातील भाजप सरकार फक्त सार्वजनिक मालमत्ता विकण्याचे काम करीत ...
सडक-अर्जुनी : स्वातंत्र्यापासून देशाच्या बांधणीसाठी काँग्रेस पक्षाने रक्त सांडविले असून, केंद्रातील भाजप सरकार फक्त सार्वजनिक मालमत्ता विकण्याचे काम करीत आहे. भाजपचे तत्कालीन राज्य सरकार व आजच्या केंद्र सरकारने ओबीसी वर्गाची फसवणूक केली आहे. सर्वांना न्याय देणाऱ्या संविधानिक प्रावधानांना बाजूला ठेवून केंद्र सरकार मनमानी कारभार करीत आहे. त्यामुळे आता पक्ष मजबूत करण्यासाठी बुथ कमिट्या नियुक्त करून प्रामाणिकपणे काम करणे हेच आपल्या कार्यकर्त्यांचे ध्येय आहे. त्यामुळे आता पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची किंमत केली जाणार असून, गटबाजी चालणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने रविवारी (दि. ५) आयोजित ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’ काँग्रेस मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. एन .डी. किरसान होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव अमर वराडे, पी. जी. कटरे, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी आमदार बबन चौधरी, माजी आमदार खतीब (अकोला), काँग्रेस नेते चंद्रशेखर शुक्ला, कार्याध्यक्ष रत्नदीप दहीवले, जिल्हा उपाध्यक्ष रामलाल राऊत, महिला काँग्रेस अध्यक्षा उषा शहारे, जिल्हा महासचिव दामोदर नेवारे, ओबीसी विभाग अध्यक्ष जितेंद्र कटरे, जिल्हा महासचिव पुष्पा खोटेले, किसान काँग्रेस अध्यक्ष जितेश राणे, तालुकाध्यक्ष मधुसूदन दोनोडे, प्रदेश प्रतिनिधी राजेश नंदागवळी, अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष परवेज बेग उपस्थित होते.
यावेळी पटोले यांच्याहस्ते हरिष कोहळे यांना तालुका महासचिव पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच नवनियुक्त प्रदेश सचिव वराडे व कटरे, तसेच नुकतेच काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे माजी आमदार बन्सोड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षाचा तिरंगा दुपट्टा घालून स्वागत करण्यात आले.
सूत्रसंचालन दामोदर नेवारे यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मधुसूदन दोनोडे यांनी केले. आभार शहर अध्यक्ष अनिल राजगिरे यांनी मानले. कार्यक्रमाला पुष्पा खोटेले, महेश सोनवाने, चुळमन लांजेवार, किरण हटवार, ब्रम्हानंद मेश्राम, अर्जुन घरोटे, ईश्वर लंजे, किशोर शेंडे, वामेश्वर टेंभरे, महेंद्र पशिने, रंजना भोई, हरिष कोहळे, निशान राऊत, सरिता कापगते, मुरलीनाथ ठाकरे, दिनेश हुकरे, नासीर पटेल, प्रकाश बापू मडावी, अलाउद्दीन राजाणी, हेमू वालदे, शंकर मेंढे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर अध्यक्ष, अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.