शेतकऱ्यांकडून प्रती कट्टा घेतात १५ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:05+5:302021-06-01T04:22:05+5:30
गोंदिया : आमगाव तालुका बहुउद्देशीय औद्योगिक सहकारी संस्थेत (र.नं. ९५९) शेतकऱ्यांकडून प्रति कट्टा १५ रुपये अधिकचे वसूल ...
गोंदिया : आमगाव तालुका बहुउद्देशीय औद्योगिक सहकारी संस्थेत (र.नं. ९५९) शेतकऱ्यांकडून प्रति कट्टा १५ रुपये अधिकचे वसूल केले जात असल्याचा प्रकार घडत आहे. या प्रकरणी ग्राम किडंगीपार येथील शेतकरी व मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष शुभम भांडारकर व बुराडीटोला येथील त्रिंकुश मटाले यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे.
आमगाव तालुक्यात रब्बी पीक ज्या शेतकऱ्यांनी घेतले ते आपले धान आमगाव तालुका बहुउद्देशीय औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये विक्री करण्यासाठी घेऊन जातात. तेथे धान्य खरेदी करण्यासाठी प्रति कट्टा १५ रुपये अधिकचे शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहे. धानाच्या कट्ट्याची ने-आण करण्यासाठी शासन हमाली देत असलेतरी तालुका बहुउद्देशीय औद्योगिक सहकारी संस्थेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत आहे. रब्बीचा हंगाम यंदा चांगला राहिला व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले. परंतु एकीकडे धानाला भाव नाही तर दुसरीकडे जे धान खरेदी केंद्र संचालक आहेत ते शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करीत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात यावी, व ही लुबाडणूक तत्काळ तरी थांबविण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भांडारकर व मटाले यांनी दिला आहे.