त्यांना गढूळ पाण्याने भागवावी लागते तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:24 PM2018-09-20T23:24:09+5:302018-09-20T23:24:45+5:30
बाबाटोली येथे दोन बोअरवेल आणि नळ योजनेच्या माध्यमातून येथील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मात्र सध्या स्थितीत हे दोन्ही साधने नाममात्र ठरत आहे. येथील फकीर समाजाच्या लोकांना गढूळ पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : बाबाटोली येथे दोन बोअरवेल आणि नळ योजनेच्या माध्यमातून येथील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मात्र सध्या स्थितीत हे दोन्ही साधने नाममात्र ठरत आहे. येथील फकीर समाजाच्या लोकांना गढूळ पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे. परिणामी बाबाटोलीवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सालेकसा नगर पंचायतमध्ये समावेश झालेली बाबाटोली यापूर्वी आमगाव खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत होती. या टोलीमध्ये आतापर्यंत केवळ दोन बोअरवेल खोदण्यात आले. बोअरवेल काही दिवस चालले त्यानंतर त्या बंद पडल्या आहेत. मात्र तेव्हापासून या बोअरवेलची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे दोन्ही बोअरवेल आजही नादुरुस्त आहेत. एवढेच नाही तर त्या बोअरवेलचे काही साहित्य सुद्धा गायब झालेले आहे. अशात रेकार्डवर जरी दोन बोअरवेलची नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याचा काहीच उपयोग नाही. बाबाटोलीवासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून यापूर्वी स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नाने मुख्य मार्गालगत एका बोअरवेलमध्ये पाईपद्वारे पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बोअरवेलची पाण्याची पातळी खोलवर गेली. त्यामुळे फार कमी प्रमाणात पाणी मिळते. परिणामी सुरुवातीच्या दहा बारा घरांना काही प्रमाणात पाणी मिळते. त्यानंतरच्या घरातील लोकांना पाणीच मिळत नाही. नळ योजनेची पाईप लाईनसुद्धा अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांनी खड्डे खोदले. तसेच या खड्डयातील गढूळ पाण्याने ते आपली तहान भागवित असल्याचे चित्र आहे. बरेचदा याच पाण्याचा उपयोग स्वयंपाक व पिण्यासाठी करावा लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले. मात्र त्यांच्या समस्येकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही. काही लोक आपल्या गरजेसाठी ग्रामीण रुग्णालय परिसरातून पाणी आणायला जातात. मात्र येथील लोक त्यांना आपल्या मोहल्यात पाण्यासाठी येऊ देत नाही. अशात बाबाटोलीवासीयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.
पाण्याच्या टाकीची सोय करुन त्याद्वारे पाणी पुरवठा केल्यास पाणी सहजतेने बाबाटोलीत पोहोचू शकते. यासाठी पाईप लाईनची दुरूस्ती करण्याची गरज आहे. तेव्हाच प्रत्येक घरापर्यंत पाणी मिळू शकले.