धावत्या गाडीतून बॅग पळविणाऱ्या चोराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:35 AM2021-09-08T04:35:08+5:302021-09-08T04:35:08+5:30
गोंदिया : धावत्या गाडीतून बॅग पळविणाऱ्या चोरट्यास रेल्वे सुरक्षा दलने सोमवारी (दि.६) रात्री ९ वाजता येथील रेल्वे स्थानकावरील क्रमांक ...
गोंदिया : धावत्या गाडीतून बॅग पळविणाऱ्या चोरट्यास रेल्वे सुरक्षा दलने सोमवारी (दि.६) रात्री ९ वाजता येथील रेल्वे स्थानकावरील क्रमांक ५ येथे पकडले. विपीन आनंद सिंह (२७, रा.गलीनंबर ११, बुराडी, उत्तर दिल्ली) असे आरोपीचे नाव आहे.
६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावरून ०२८३३ अहमदाबाद एक्स्प्रेस फलाट क्रमांक- ४ वरून रवाना होताच, गाडीतून बॅग़ चोरून विपीन सिंग गाडीतून विरुद्ध बाजूने उतरताना आढळून आला होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो फरार झाला. याबाबत माहिती मिळताच, रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहीम राबविली असता, रात्री ९ वाजता फलाट क्रमांक ५ येथे नागपूरकडे जाणाऱ्या रुळावर तो बॅगसह आढळला. त्याला पकडून विचारपूस केल्यावर त्याच्याजवळ चोरी केलेली बॅग आढळली. रेल्वे पोलिसात त्याच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याजवळून ५,७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.