नागपूरच्या अट्टल चोरट्यास गोंदिया पोलिसांनी केली अटक
By नरेश रहिले | Published: June 27, 2023 07:49 PM2023-06-27T19:49:54+5:302023-06-27T19:51:23+5:30
दोघांजवळून क्रेटासह ३.२५ लाख रोख जप्त: गोंदियातही आहेत तीन गुन्हे दाखल
गोंदिया: नागपूर शहरातील सराईत गुन्हेगार व गोंदिया जिल्ह्यातीलही तिन ठिकाणी मोठी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मरारटोली, बसंत नगर परिसरातून अटक करण्यात आली. ही कारवाई २६ जून रोजी पहाटे ४ वाजता करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीत नरेश अंकालू महीलांगे (२६) रा. दीप्ती सिग्नल पुजाराम वाडी, कळमना नागपूर व दीपक चंदू बघेले (२२) रा. पिपरीया ता. खैरागड जि. राजनादगाव (छत्तीसगड) यांचा समावेश आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी नरेंद्रकुमार जैन यांच्या देवरी आमगाव रोड महावीर राइस मिल मधील ४ लाख ३८ हजार रूपये, नवाटोला येथील यादोराव नरसय्या पंचमवार यांच्या राहते घरून सोन्याचे दागिणे व रोख ६२ हजार रूपये, एकाच रात्र दरम्यान दोन घरफोड्या घडल्या होत्या. डुग्गीपार पोलिस सडक-अर्जुनी येथील २५ मार्च २०२३ चे ११ ते ६:३० वाजता दरम्यान जिल्हा को ऑपरेटीव्ह बँकेचे चॅनल गेटचा कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता.
ह्या तिन्ही चोरी या आरोपींनी केल्या होत्या. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी तिन्ही दाखल गुन्ह्यातील आरोपितांचा शोध तत्काळ घेण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलिसांना दिले होते. स्थानिक गुन्हे शाखा, देवरी पोलीस ठाणे, डुग्गीपार पोलीस पथक यांनी फरार झालेल्या अज्ञात आरोपीतांचा कसोसिने शोध घेत होते. २८ मार्च रोजी आरोपी प्रदीप उर्फ दादू देवधर ठाकूर (३०) रा. देवधर महतो, वारभाट (छत्तीसगङ) याला अटक करण्यात आली होती.
त्याच्याजवळून ३ लाख ४७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला होता. अटक असलेल्या आरोपीने नरेश महिलांगे याच्या सोबत मिळून तिन्ही गुन्हे केल्याचे सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, रामनगरचे संदेश केंजले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर, विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विघ्नें, पाटील, सहाय्यक फौजदार कावळे, पोलीस हवालदार मिश्रा, मेहर, देशमुख, कोडापे, हलमारे, लुटे, भेलावे, बिसेन, शेख, तुरकर, ठाकरे, पटले, पोलीस शिपाई केदार, रहांगडाले, भांडारकर, चालक पोलीस शिपाई गौतम, पांडे तसेच पोलीस ठाणे रामनगर, रावणवाडी, गंगाझरी पोलीस पथकाने केली आहे.
तीन महिन्यापासून होते मागावर
आरोपी नरेश महीलांगे याच्या मागावर गोंदिया पोलिस मागील तीन महिन्यापासून होती. नागपूर, रायपूर, राजनांदगाव, छत्तीसगड येथे शोध घेण्यात येत होता. मागील महिन्यात त्या आरोपीने नागपूरला दीड कोटी रुपयांची चोरी केली. तो नागपूर पोलीसांना सुध्दा पाहिजे आरोपी होता. पाचपावली पोलीस ठाणे अंतर्गत २५ जून रोजी क्रेटा गाडी आणि रोख रक्कम चोरी केली होती.
नागपुरातून चोरलेली क्रेटा कुडवात आढळली
नागपूरातून चोरलेली क्रेटा गोंदियाच्या कुडवा येथे असल्याचे गंगाझरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर यांना दिसली. गोंदिया पोलीस त्या गाडी आणि आरोपीचा शोध घेत असताना क्रेटा गाडीतील आरोपीला पोलीस आपल्यामागे लागल्याची चाहूल लागताच क्रेटा गाडी सोडून पळून गेला. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून मरारटोली, बसंत नगर परिसरातून अटक केली.
५० गुन्हे नोंद
आरोपी नरेश महीलांगे याला देवरी पोलिसांच्या तर आरोपी दीपक चंदू बघेले याला पाचपावली नागपूर पोलीसांचे ताब्यात मुद्देमालासह स्वाधिन करण्यात आले आहे. आरोपी नरेश महीलांगे अत्यंत सराईत आरोपी असून त्याने महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा, गोंदिया, जिल्ह्यात घरफोड्या करुन धुमाकूळ घातला. छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातील इतर जिल्ह्यात मोठ्या रकमेच्या घरफोड्या, चोऱ्या, मोटर सायकली, मोठी वाहने चोरी केल्या आहेत. त्याच्यावर साधारणत: ५० च्यावर गुन्ह्याची नोंद आहे.