बीअर बारमधील चोरीच्या आरोपींना चंद्रपुरातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 10:04 PM2018-06-28T22:04:01+5:302018-06-28T22:04:25+5:30
महागाव येथील रिध्दी-सिध्दी बिअरबारमध्ये झालेल्या चोरीच्या आरोपींना सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी चंद्रपुरातून अटक केलीे. यापैकी दोन आरोपींचा विविध गुन्ह्यात समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : महागाव येथील रिध्दी-सिध्दी बिअरबारमध्ये झालेल्या चोरीच्या आरोपींना सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी चंद्रपुरातून अटक केलीे. यापैकी दोन आरोपींचा विविध गुन्ह्यात समावेश आहे.
१६ व १७ जूनच्या रात्री दरम्यान बिअरबारचे समोरील प्रवेशद्वार व दरवाजाचे कुलूप तोडून आरोपींनी तीन हजार रुपये रोख व विदेशी दारुच्या १० पेट्या किंमत ६४ हजार ५८४ असे एकूण ६७ हजार ५८४ रुपयांची चोरीची घटना महागाव येथे घडली होती.
आरोपींच्या हालचाली बिअरबारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या. या नोंदी बघून पोलिसांनी तपास सुरु केला. प्रथमत: या नोंदी व्हाट्सअॅप ग्रुपवरुन सर्व पोलीस स्टेशनला पाठविण्यात आल्या. सीसीटीव्हीत कैद झालेल्या चेहºयांची ओळख पटविण्यासाठी आरमोरी, गडचिरोली येथे पोलीस पथक रवाना झाले मात्र यात काहीच निष्पन्न झाले नाही. पोलीस पथक चंद्रपूरला रवाना झाले. तेथील पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी सोबत घेतले.
आरोपीच्या घरी पोहचून मोठ्या शिताफीने मनी कालीपद विश्वास (३५) रा. शामनगर चंद्रपूर, रोहीत उर्फ राजू दिनेश वर्मा (३०) व हंसराज उर्फ शुभम त्रिशुले (२१) दोघेही रा. रयतवाडी वार्ड चंद्रपूर यांना अर्जुनी मोरगाव पोलिसांनी अटक केली.
आरोपींनी चोरीच्या या गुन्ह्यात टाटा इंडिका कार क्रमांक एमएच ३१/बीबी-९१२७ चा वापर केल्याने हे वाहन जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी ही चोरी दारुविक्रीसाठी केल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपींकडून चोरीच्या ऐवजापैकी २६ हजार ८१० रुपयांची विदेशी दारु ८२०० रुपये रोख व ४५ हजार रुपये किंमतीचे वाहन असा एकूण ८० हजार २० रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
ईश्वरदास विठोबा बडवाईक यांचे फिर्यादीवरुन अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तीन्ही आरोपीविरुध्द कलम ४५७, ३८० भादंविचा गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपींना २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
हेटी (खामखुर्रा) येथील घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. यापैकी काही आरोपी सराईत असून त्यांचेकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे यांचे मागदर्शनाखाली सपोनि अनिल कुमरे, सहा. फौजदार माणिक खरकाटे, पो.हवा. गजेंद्र मिश्रा व नापोशि विजय कोटांगले अधिक तपास करीत आहेत.