सडक-अर्जुनी तालुक्यात चोरांचा सुळसुळाट
By Admin | Published: June 2, 2017 01:31 AM2017-06-02T01:31:00+5:302017-06-02T01:31:00+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यात मागील पंधरवाड्यापासून चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. बाहेर राज्यातील चोरांनी गोंदिया जिल्हा निवडला
दहशत कायम : डुग्गीपार पोलिसांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यात मागील पंधरवाड्यापासून चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. बाहेर राज्यातील चोरांनी गोंदिया जिल्हा निवडला असून त्यातही सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक चोरीच्या घटना घडत आहेत. चोरांच्या सुळसुळाटाने नागरिक भयभीत झाले आहेत.
विशेष म्हणजे हे चोर सर्वसाधारण असून वेड्यासारखे दिसतात. सौंदड येथे बुधवारी बाजारात एका अनोळखी तरूणाने बाजार करणाऱ्या इसमाचा मोबाईल चोरला. एवढ्यात लोकांनी त्याला पकडले व सामूहिक पिटाई केली. तेव्हा त्या चोराने आम्ही १५० लोक आहोत, असे सांगितले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार होते, मात्र बेशुद्ध झाल्याचे सोंग घेवून तो चोर हिसका देवून पळून गेला.
तर दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी चार चोर शास्त्री वार्डात बोलेरो गाडीने आले. वार्डातील एका व्यक्तीला रात्री १.३० वाजताच्या सुमारास ते आढळले. चोरांनी त्याला धमकी दिल्याने आरडाओरड झाली व लोक जागे झाले. त्यामुळे चोरांनी पळ काढला. तर चिखली बाजारामध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या एका इसमाला बेदम मारहाण करण्यात आली.
पिपरी गावामध्ये एका अनोळखी वृद्ध महिला चोरी करताना आढळली. तिला गावकऱ्यांनी पोलिसांच्या हवाली केले. तर पांढरी येथे तीन ते चार इसम चोरी करताना आढळले.
तालुक्यातील गावांमध्ये वेडसर वृत्तीचे लोक आले तरी कुठून, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत आले असून त्यांना रात्रीची झोप घेणे कठिण झाले आहे. नागरिक स्वत: गस्त घालून गाव संरक्षणाचे काम करीत आहेत. रात्रीच्या वेळी अनोळखी माणसे आढळल्यास ‘चोर आलारे-आलारे’ असे आवाज देवून नागरिकांना जागे केले जात आहे. मात्र पोलिसांची कारवाई शून्यच दिसून येत आहे. अधिकाऱ्यांनी काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे डुग्गीपार पोलिसांच्या सतर्कतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.