शेंडा परिसरात चोरांचा सुळसुळाट
By admin | Published: June 4, 2017 12:54 AM2017-06-04T00:54:25+5:302017-06-04T00:54:25+5:30
चोरींच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ होत असतानाच शेंडा परिसरातही चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.
पोलीस प्रशासन सुस्त : गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : चोरींच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ होत असतानाच शेंडा परिसरातही चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. यात महिलासुद्धा संशयास्पद स्थितीत आढळून येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.
शुक्रवार (दि.२) रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास लागूनच असलेल्या कोहळीपार येथे दोन अज्ञात महिला संशयास्पद हालचाली करताना त्याच गावातील कृष्णा बावणकुळे यांना दिसल्या. सध्या चोरीच्या घटना होत असल्याने त्यांच्या मनात शंका बळावली. या चोर तर नाही, असे शब्द काढताच त्या जंगलाच्या दिशेने पळून गेल्या. ही चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
सडक-अर्जुनी तालुक्यात जिकडेतिकडे चोरांचा सुळसुळाट असल्याचे ऐकण्यात येत होते. मात्र चोरीची एकही घटना गावात घडली नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त होते. परंतु शुक्रवारच्या घटनने शेंडा परिसरात चोरांनी प्रवेश केला असावा, असे मानले जाते.
चोरी किंवा अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सज्ज असायला हवे. वेळीच दखल घेतल्यास वचक बसून पुनरावृत्ती होणार नाही. मात्र तसे होताना दिसत नाही. उलट शेंडा बिटमध्ये कोणते पोलीस कार्यरत आहेत, याची कल्पनासुद्धा गावातील बहुतांश लोकांना नसावी, असे समजते.
शेंडा ते देवरी पोलीस ठाण्याचे अंतर २० किमी आहे. वेळीअवेळी कोणतीही अप्रिय घटना घडल्यास तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविणे कठिण असते. भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्यावर ती स्वीकारली जात नाही.
सुरक्षेच्या दृष्टीने बिट अंमलदाराने आठवड्यातून किमान पाच ते सहा दिवस गस्त घातल्यास चोरट्यांवर तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर आळा बसू शकतो. परंतु तसे होताना दिसून येत नाही.
या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शेंडा हे गाव मध्य ठिकाण असल्याने पोलीस चौकी देण्यात यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. सध्या चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांनी अधूनमधून या पसिरातील गावांमध्ये गस्त घालून नागरिकांना सुरक्षा प्रदान करावी, अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे.