रक्तातील नात्यात लग्न करण्याआधी विचार करा, हे घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 04:45 PM2024-10-26T16:45:27+5:302024-10-26T16:47:52+5:30
आरोग्यपत्रिका तपासून लग्न जुळवा : आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी एक पाऊल पुढे या
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विवाह जुळविताना आपण कुंडली जुळवितो. पण, आता आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व सिकलमुक्त समाजनिर्मितीसाठी कुंडली जुळविण्यापेक्षा आरोग्यपत्रिका तपासून लग्न जुळवा. कारण, सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार आहे. सिकल कॅरिअरच्या माध्यमातून हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो. तेव्हा सिकलसेलचे जर समूळ उच्चाटन करायचे असेल, तर विवाहयोग्य मुला- मुलींची सिकल स्क्रीनिंग करा, जवळच्या नात्यात लग्न करू नका. सिकलसेल असेल तर लपवू नका, नियमित आरोग्य तपासणी करा व हिमोग्लोबिनची पातळी बरोबर ठेवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करा, फॉलिक अॅसिडच्या गोळ्या नियमित घ्या, असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जातो. परंतु, अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात.
संपूर्ण आरोग्य तपासणी
जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्फत सिकलसेल सोल्युबिलिटी तपासणी करण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील गाव पातळीवरील आरोग्यसेविका व आशासेविका यांच्या मार्फत रक्त तपासणी व समुपदेशन निःशुल्क करण्यात येत आहे.
काय काळजी घ्यायला हवी
जिल्ह्यातील एकूण पाच केंद्रांवर चाचणी करण्यात येत आहे. या चाचण्या जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय रजेगाव, ग्रामीण रुग्णालय आमगाव आणि ग्रामीण रुग्णालय देवरी येथे होतात.
रक्तातील नात्यात लग्न केल्यास...
लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांची रक्ताची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. दोघेही सिकलसेल वाहक असतील, एक वाहक व एक ग्रस्त असेल, दोघेही ग्रस्त असतील, तर त्यांच्या होणाऱ्या अपत्याला सिकलसेल आजार होऊ शकतो. म्हणून रक्तातील नात्यात होणार विवाह टाळावे.
डॉक्टर काय म्हणाले
"विवाहयोग्य मुला-मुलींची सिकल स्क्रीनिंग करा, जवळच्या नात्यात लग्न करू नका. सिकलसेल असेल, तर लपवू नका, नियमित आरोग्य तपासणी करा व हिमोग्लोबिनची पातळी बरोबर ठेवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करा, फॉलिक अॅसिडच्या गोळ्या नियमित घ्या."
- डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया
"सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार आहे. सिकल कॅरिअरच्या माध्यमातून हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो. तेव्हा सिकलसेलचे जर समूळ उच्चाटन करायचे असेल तर, विवाह योग्य मुला-मुलींची सिकल स्क्रीनिंग करा, जवळच्या नात्यात लग्न करू नका."
- डॉ. सुवर्णा हुबेकर, वैद्यकीय अधिकारी, गोंदिया