गोंदिया जिल्ह्यात सलग तिस-या दिवशी मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 03:39 PM2018-07-17T15:39:11+5:302018-07-17T15:39:14+5:30
२० पेक्षा अधिक मार्ग बंद : पुजारीटोला धरणाचे पाच दरवाजे उघडले
गोंदिया : जिल्ह्यात रविवारी (दि.१५) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) सलग तिसºया दिवशी सुध्दा कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरुन वाहत असल्याने २० पेक्षा अधिक मार्ग बंद झाले होते. तर गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील काही वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली. बाघ नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पुजारीटोला धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले.
जिल्ह्यात मागील चौवीस तासात चार तालुक्यात अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक १९१.८५ मि.मी.पावसाची नोंद आमगाव तालुक्यात झाली.सालेकसा तालुक्यात १७३.६७ मि.मी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात ९५.२० व गोरेगाव तालुक्यात १२८.३३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. हा या तालुक्यातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे.जिल्ह्यातील एकूण ३३ महसूल मंडळापैकी २१ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील चौवीस तासात १०५.६१ मि. मी. पावसाचीे नोंद झाली आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे मदत कार्य सुरू करण्यास अडचण निर्माण झाली होती. आमगाव तालुक्यातील बनगाव गावाला पाण्याने वेढा घातल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. सालेकसा तालुक्यातील नदी काठलगत असलेल्या गावांना पावसाचा जोरदार फटका बसला. गोंदिया शहरातील शास्त्रीवार्ड, सुर्याटोला, महालक्ष्मी राईसमिल परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. दरम्यान नागरिकांची ओरड वाढल्यानंतर नगर परिषदेने उपाय योजनेला सुरूवात केली. दरम्यान मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झाल्याचे चित्र होते.
या मार्गावरील वाहतूक ठप्प
जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पांगोली नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने गोरेगाव-सोनी-ठाणा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर आमगाव-देवरी मार्गावरील नाल्याला पूर आल्याने आमगाव-देवरी, सालेकसा-देवरी, आमगाव-कामठा, आमगाव-वडेगाव, बिजेपार-साखरीटोला, बिजेपार- अंजोरा, बोरकन्हार, बिजेपार-सालेकसा-गांधीटोला, सालेकसा-राजनांदगाव मार्ग बंद होता. कमरगाव नदीवरील पुलावर पाणी असल्याने मुंडीपार-तेढा या गावाचा संर्पक तुटला होता. आमगाव-शिवणी, आमगाव-चिरचाळबांध, आमगाव-तिगाव या मार्गावरील वाहतूक सुध्दा चार ते पाच तास ठप्प झाली होती.
जिल्ह्यात तालुका निहाय पडलेला पाऊस
तालुका झालेला पाऊस
गोंदिया ६०.६४ मि.मी.
गोरेगाव १२८.३३ मि.मी.
तिरोडा ५३.४६ मि.मी.
अर्जुनी मोरगाव ९५.२० मि.मी.
आमगाव १९१.८५ मि.मी.
सालेकसा १७३.६७ मि.मी.
जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा
इटियाडोह ३४.७१ टक्के
सिरपूर १५.७३ टक्के
पुजारीटोला ७९.६८ टक्के
कालीसरार ४४.८४ टक्के
संजय सरोवर ३६.९५ टक्के