बंड तलाव भागवितोय वन्यप्राण्यांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:27 PM2019-05-06T22:27:34+5:302019-05-06T22:28:07+5:30

यंदा एप्रिल महिन्यातच सूर्य कोपल्याने नदी, नाले व तलाव कोरडे पडले आहे. परिणामी मानवासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे. मात्र गोरेगाव तालुक्यातील बंड तलाव वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. या तलावात मे महिन्यातही भरपूर पाणी शिल्लक असून वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी हा तलाव महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Thirsty wildlife | बंड तलाव भागवितोय वन्यप्राण्यांची तहान

बंड तलाव भागवितोय वन्यप्राण्यांची तहान

Next
ठळक मुद्देवनविभागाची उपाय योजना : रोपवाटिकेला होतेय मदत

दिलीप मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरदोली (गोंदिया) : यंदा एप्रिल महिन्यातच सूर्य कोपल्याने नदी, नाले व तलाव कोरडे पडले आहे. परिणामी मानवासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे. मात्र गोरेगाव तालुक्यातील बंड तलाव वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. या तलावात मे महिन्यातही भरपूर पाणी शिल्लक असून वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी हा तलाव महत्त्वपूर्ण ठरत आहे.
मुरदोली वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातंर्गत येणारा बंड तलाव हा मुरदोली मध्यवर्ती रोपवाटिका व वन्यप्राण्यांसाठी जीवदान देणारा ठरत आहे. या तलावाची निर्मिती १९६५ मध्ये करण्यात असून दोन हेक्टर परिसरात या तलावाचा विस्तार आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये सुध्दा या तलावात पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहतो.
त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी व या परिसरातील रोपवाटीकेतील रोपट्यांना पाणी देण्यासाठी या तलावाची फार मदत होत आहे. वन विभागाने सुध्दा या तलावाचे महत्त्व ओळखून तलावाचा परिसर स्वच्छ करुन सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न केला. गोरेगाव तालुक्यातील जंगलाचा काही भाग आणि नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प आणि नागझिरा अभयारण्याला लागून आहे.
त्यामुळे या परिसरात नेहमी वन्यप्राण्यांचा वावर असतो. मागील वर्षी या भागात झालेल्या प्राणी गणणेनुसार या भागात विविध प्रजातीचे ६६६ वर वन्यप्राणी आहेत. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणवठे कोरडे पडत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात.
मात्र यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनेत वाढ होते. हा प्रकार टाळण्यासाठी वन आणि वन्यजीव विभागातर्फे उपाय योजना केल्या जातात.
मात्र बरेचदा त्यात अभाव दिसून येतो. मात्र मुरदोली येथील बंड तलाव उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
रोपटे वाचविण्यासाठी तलावाची मदत
जिल्ह्यातील सर्वात मोठी मध्यवर्ती रोपवाटिका मुरदोली येथे आहे.या रोपवाटीकेत दरवर्षी विविध प्रजातीचे ८ लाख रोपटे तयार केले जातात. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर सुध्दा वृक्षारोपणासाठी रोपटे उपलब्ध करुन दिले जातात. उन्हाळ्यात रोपटे वाचविण्यासाठी पाण्याची गरज भासते. ही गरज बंड तलावातील पाण्याने भागविली जाते. त्यामुळे रोपटे वाचविण्यासाठी सुध्दा या तलावाची मोठी मदत होत असल्याचे वनरक्षक तूरकर यांनी सांगितले.
तलाव झाले वन्यप्राण्यांच्या दर्शनाचे ठिकाण
नागझिरा अभयारण्यातील मुरदोली गावाजवळ रोपवाटिका आहे. याच परिसरात बंड तलाव असून तलावात बारमाही पाणी असते. मागील ५५ वर्षांपासून हे तलाव कधीच आटले नसल्याचे या परिसरातील गावकरी सांगतात.विशेष उन्हाळ्यात या तलावावर पाणी पिण्यासाठी मोठ्या वन्यप्राणी येतात. त्यामुळे या दिवसात या ठिकाणी हमखास विविध वन्यप्राण्यांचे दर्शन होते. त्यामुळे वन्यजीव प्रेमी सुध्दा प्राण्यांना पाहण्यासाठी हजेरी लावतात.
पर्यटनस्थळ म्हणून विकास करा
गोरेगाव वनविभागाने बंड तलावाचे सौंदर्यीकरण करुन या परिसराचा विकास करण्याबाबत अनेकदा शासनाकडे प्रस्ताव पाठविले. मात्र अद्यापही या प्रस्तावाला मंजुुरी मिळाली नाही. शासनाने यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्यास हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून उदयास येऊ शकते.

बंड तलावाचे सौंदर्यीकरण व स्वच्छतेकरीता वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाव्दारे प्रस्ताव तयार करून जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. पण अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही.
- सुरेश जाधव
वनपरिक्षेत्राधिकारी गोरेगाव

Web Title: Thirsty wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.