जिल्ह्यातील १३ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:18+5:30
शहरातील गणेशनगर परिसरातील एका२३ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी अहवालानंतर स्पष्ट झाले.त्यामुळे शहरासह जिल्ह्यावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे तब्बल दहा दिवसानंतर उघकीस आले.त्यामुळे दहा दिवसांच्या कालावधीत हा तरुण अनेकांच्या संपर्कात आला. याचा शोध सध्या घेतला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया येथील युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या संपर्कात आलेले एकूण १३ जणांचे नमुने तपासणीसाठी नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.यासर्वांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून १३ जणांचा रिेपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे निश्चितच शहरवासीयांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.
शहरातील गणेशनगर परिसरातील एका२३ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी अहवालानंतर स्पष्ट झाले.त्यामुळे शहरासह जिल्ह्यावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे तब्बल दहा दिवसानंतर उघकीस आले.त्यामुळे दहा दिवसांच्या कालावधीत हा तरुण अनेकांच्या संपर्कात आला. याचा शोध सध्या घेतला जात आहे. त्यामुळे सदर बाधीत युवकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले. तर त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील पाच सदस्य आणि तीन मित्रांना सुर्याटोला परिसरातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. दरम्यान बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या एकूण १३ जणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी ११ जणांचा रिपोर्ट शनिवारी तर दोन जणांचा रिपोर्ट रविवारी जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाला.
या १३ जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून यासर्वांना १४ दिवसांपर्यत विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
गणेशनगरवर सर्वांचीच नजर
शहरातील गणेशनगर परिसरात एक कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर आला आहे.तर खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारपासूनच नगर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. या भागात चारही बाजुचे रस्ते बंद करुन पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा दररोज या भागाचा आढावा घेत आहे. तर सर्वांच्या नजरा गणेशनगरकडेच लागल्या आहेत.
पीएनबीच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
शहरातील गणेश नगरातील एका २३ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे तब्बल दहा दिवसांनंतर पुढे आले. ही बाब उशिरा उघडकीस आल्याने दहा दिवसांच्या कालावधित हा युवक अनेकांच्या संपर्कात आला. तसेच हा युवक १७ मार्च रोजी आर्थिक व्यवहारासाठी शहरातील जयस्तंभ चौकातील पंजाब नॅशनल बँकेत सुध्दा गेला होता. जवळपास दोन तास तो बँकेत थांबला होता असल्याचे बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन पुढे आले आहे. ही बँक व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर व्यवस्थापकाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन बँकेचे निर्जतुंकीकरण करण्याबाबत पत्र दिले. तसेच बँकेचे सर्व कर्मचारी आपली आरोग्य तपासणी करुन घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तपासणी करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठविले
कोरोना बाधित युवक पंजाब नॅश्नल बँकेत आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँक व्यवस्थापकाने चार कर्मचाºयांना तपासणीसाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. मात्र येथील डॉक्टरांनी तुम्हाला कोरोनाची कुठलीच लक्षणे दिसत नसल्याचे सांगून तपासणी न करताच पाठविले. तसेच लक्षणे दिसतील तेव्हा तपासणी करु असे उत्तर देऊन परत पाठविल्याचे बँकेच्या कर्मचाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
विलगीकरण कक्षातील युवकांचा धुमाकूळ
कोरोना बाधित युवकाच्या संपर्कात आलेल्या चार मित्रांना सध्या आयुर्वेदिक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. मात्र हे युवक तेथील डॉक्टरांचे ऐकत नाही.तसेच कक्षाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असल्याने उपचार करीत असलेले डॉक्टर सुध्दा त्रस्त झाले आहे.त्यामुळे याची तक्रार अधिष्ठातांनी जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे केल्याची माहिती आहे.
प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळटाळ
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोना संदर्भात कुठलीही चुकीची माहिती नागरिकांपर्यंत पोहचू नये यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी नोडल अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत आहे. मात्र अनेक जवाबदार अधिकारी मोबाईल उचलत नसून काही जणांनी फोन उचलला तर जिल्हाधिकाºयांनी माहिती देण्यास मनाई केली आहे असे सांगतात. त्यामुळे मागील दोन तीन दिवसांपासून प्रशासनाकडून कोरोना संदर्भातील माहिती देण्यास टाळले जात आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.एकीकडे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री दररोज प्रसारमाध्यमाना स्वत:हून माहिती देत आहे. मग जिल्हा प्रशासनाला खरी माहिती देण्यास नेमकी काय अडचण जात आहे, हे मात्र समजण्यापलिकडे आहे. तर प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी नेमलेल्या नोडल अधिकाºयांना सुध्दा मोबाईल उचलण्याची अॅलर्जी असल्याचा अनुभव आला.