तंत्रज्ञानाचा वापर करून अशी होते गुन्ह्यांची उकल ! तंत्रज्ञान पोलिसांसाठी ठरतेय वरदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:00 IST2025-01-22T15:58:02+5:302025-01-22T16:00:21+5:30
Gondia : सीसीटीव्ही'मुळे शेकडो गुन्हे उघडकीस

This is how crimes are solved using technology! Technology is a boon for the police
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात एकीकडे गुन्ह्यांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे गुन्ह्यांचा छडा लावण्याचा वेगदेखील वाढला आहे. विशेषतः शहरात ठिकठिकाणी लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे व तांत्रिक तपासाची पोलिसांना मोठी मदत होत आहे. हे तंत्रज्ञानपोलिसांसाठी वरदानच ठरत आहे. याच्याच मदतीने अनेक मोठ्या गंभीर गुन्ह्यांसह हजाराहून अधिक प्रकरणांत आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये शहरात हत्या, घरफोडी, महिला अत्याचार, चोरी, वाहनचोरी या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. याशिवाय अगोदरच्या गुन्ह्यांचा तपासदेखील प्रलंबित होता. अशा पद्धतीने पोलिसांच्या मागे तपासाची डोकेदुखी वाढली. मात्र, सीसीटीव्हीमुळे अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करीत आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे.
कुठलाही दुवा नसताना केवळ या तिसऱ्या डोळ्यामुळे आरोपींचा तपशील, चेहरा, दुचाकी किंवा कारचा क्रमांक आढळतो. त्याच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचतात. मागील आठवड्यात एका घरफोडी करणाऱ्या आरोपींचा कुठलाही दुवा नसताना केवळ सीसीटीव्हीच्या मदतीमुळे शोध लागू शकला. सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी करून पोलिसांनी आरोपींचा दुचाकी क्रमांक शोधला व त्याआधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
३३ टक्के चोऱ्यांतील आरोपींना पकडले
गोंदिया जिल्ह्यात मागच्या वर्षात दोन दरोडे, ११ जबरी चोरी, २० दिवसा घरफोडी, १०१ रात्र घरफोडी व ३६३ चोऱ्या झाल्या आहेत. यात कोट्यवधीची संपत्ती चोरीला गेली आहे. या प्रकरणात ३० टक्के चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.
कार्यपद्धती बदलल्याने पोलिसांच्या हाताला यश
शहरातील बहुतांश पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सीसीटीव्हीचे जाळे आहेत. याशिवाय मोठ्या गुन्ह्यांमध्ये पोलिस सायबर सेलच्या मदतीने ई- सर्व्हेलन्सवर भर देतात. त्याला खबऱ्यांच्या नेटवर्कची देखील जोड मिळते. कार्यपद्धतीत बदल केल्याने पोलिसांना यश मिळत आहे.
बलात्कारीही अटकेत
गोंदिया जिल्ह्यात महिलासंदर्भात गुन्हे वाढत आहेत. ८९ मुलींवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंद आहेत. ११४ महिला-मुलींचा विनयभंग झाला आहे. १२५ मुली, महिलांचे अपहरण झाले आहेत. बलात्कार व विनयभंगातील ९८ टक्के आरोपी अटकेत आहेत.
आरोपीही लढवितात विविध शक्कल
अनेकदा गुन्हेगार गुन्ह्यात वापरलेला मोबाइल किंवा सीमकार्ड फेकून देतात. अशा वेळी त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण होते. पोलिसांच्या हातात लागू नये यासाठी आरोपीही विविध शक्कल लढवितात.
तपासात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत
आता पोलिसांना तपासात आधुनिक तंत्रज्ञानाची मदत होते. मोबाइलवरून आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येते. तपास कार्य जलद करण्यासाठी आता पोलिसांच्या मदतीसाठी अनेक आधुनिक तंत्रज्ञान आहे.
गुन्हे न उकलण्याची मुख्य कारणे काय?
तंत्रज्ञानाची मदत असतानादेखील काही गुन्हे उकलण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सीसीटीव्हीच्या रेंजमध्ये न झालेले गुन्हे किंवा दाट वस्तीत झालेल्या गुन्ह्यांचा यात जास्त प्रमाणात समावेश आहे.