‘त्या’ ३४१ गावात चावडी वाचनाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 10:29 PM2017-10-24T22:29:39+5:302017-10-24T22:29:49+5:30
जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने चावडी वाचन कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने चावडी वाचन कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबरला पार पडल्यानंतर सोमवार (दि.२३) पासून चावडी वाचनाला सुरूवात करण्यात आली आहे. यानंतर किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले, हे निश्चित होणार आहे.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर या अर्जांची छाननी आणि चावडी वाचनानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधीत पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केली जाणार होती. चावडी वाचनादरम्यान ज्या शेतकºयांच्या नावावर आक्षेप घेण्यात येईल, ती नावे वगळून चौकशीनंतर लाभ दिला जाणार होता. ही संपूर्ण प्रक्रिया १५ ते २० दिवसांपूर्वीच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यात १६ आॅक्टोबरला ३४१ ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने त्यासाठी आचार संहिता लागू होती. परिणामी या काळात चावडी वाचन घेता येत नव्हते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या ३४१ गावांमध्ये निवडणुकीनंतर चावडी वाचन घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यानुसार सोमवार (दि.२३) या गावांमध्ये चावडी वाचनास सुरूवात झाली आहे. सहकार निबंधक कार्यालयाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार चावडी वाचनादरम्यान जे शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. त्यांच्या नावांची यादी वाचली जात आहे. त्यानंतर ही यादी राज्य शासनाकडे पाठविली जाणार आहे. आत्तापर्यंत १०२ कर्जमाफीस पात्र शेतकºयांची अंतीम यादी सरकारकडे पाठविली असून यापैकी २३ शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. ३४१ गावांमध्ये चावडी वाचनाची प्रक्रिया किमान पंधरा दिवस चालणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी दोन महिने प्रतिक्षा करावी लागणार असल्याची माहिती आहे.
तीन याद्या तयार होणार
शेतकरी कर्जमाफीकरिता आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांच्या तीन याद्या तयार केल्या जाणार आहेत. यासाठी हिरव्या रंगाच्या यादीत पात्र लाभार्थी, लाल रंगाच्या यादीत अपात्र लाभार्थी, आणि पिवळ्या रंगाच्या यादीत अर्जांमध्ये त्रृटी असलेल्या शेतकºयांचा समावेश आहे. यासर्व याद्या तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालय आणि नंतर शासनाला पाठविण्यात येणार आहे.