जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांना १४ दिवस राहावे गृहविलगीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:28+5:302021-04-28T04:31:28+5:30
गोंदिया : शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम आणखीन कडक केले आहे. आता लग्नात २५ पेक्षा अधिक लोक आढळून ...
गोंदिया : शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम आणखीन कडक केले आहे. आता लग्नात २५ पेक्षा अधिक लोक आढळून आल्यास त्यांच्या कुटुंबावर ५० हजाराचा दंड ठोठावण्याचे आदेश आहे. एवढेच नव्हे तर लग्न सभारंभ दोन तासातच उरकावा लागणार आहे. तसेच अन्य जिल्ह्यातून, प्रवास करून जिल्ह्यात पोहोचताच होम क्वारंटाईनचा शिक्का हातावर लावण्यात येणार आहे. हा नियम २२ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून लागू करण्यात आला आहे.
कोरोना संक्रमणाला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवे नियम जारी केले आहे. शासकीय कार्यालयात केवळ १५ टक्के तसेच पाचच कर्मचारी काम करू शकणार आहे. तर आवश्यक सेवा देणाऱ्या कार्यालयात ५० कर्मचारी काम करू शकणार आहे. लॉकडाऊनच्या नव्या नियमानुसार प्रवासाला घेऊन कडक प्रतिबंधित आदेश जारी करण्यात आले आहे. आता खासगी बसमध्ये ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. प्रवासात केवळ आरोग्य विभागाशी निगडित असलेले तसेच अंत्यविधीत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला मंजुरी राहणार आहे. अत्यावश्यक सोडून विनाकारण प्रवास करताना प्रवासी आढळून आल्यास १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. प्रवासापूर्वी प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येताच प्रवाशाच्या हातावर बसस्थानक व रेल्वेस्थानकावर १४ दिवसांचा होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे. या सर्व नियमांचे उल्लघंन झाल्यास संबंधित कुटुंब, हॉल मालकावर ५० हजाराचा दंड आकारल्या जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात हे नवे नियम २२ एप्रिलच्या रात्रीपासून लागू करण्यात आले आहे.