जिवावर उदार होऊन मृतदेह हातळणाऱ्यांना मिळताय ८०० रुपये दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:28 AM2021-05-24T04:28:24+5:302021-05-24T04:28:24+5:30

गोंदिया : कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता रुग्णालयात मृत्युमुखी पडणाऱ्या कोरोनाबाधितांचे मृतदेह हाताळण्यापासून स्मशानभूमीपर्यंत पोहोचविण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर वॉर्डबाॅयसारख्या कर्मचाऱ्यांची ...

Those who are generous with their lives and handle the body get a price of Rs. 800 | जिवावर उदार होऊन मृतदेह हातळणाऱ्यांना मिळताय ८०० रुपये दाम

जिवावर उदार होऊन मृतदेह हातळणाऱ्यांना मिळताय ८०० रुपये दाम

Next

गोंदिया : कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता रुग्णालयात मृत्युमुखी पडणाऱ्या कोरोनाबाधितांचे मृतदेह हाताळण्यापासून स्मशानभूमीपर्यंत पोहोचविण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर वॉर्डबाॅयसारख्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मृतदेह कापडात व्यवस्थित गुंडाळणे, मृतदेह रुग्णवाहिकेने स्मशानघाटावर नेण्याची आणि अंत्यसंस्कार पार पाडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी हे वाॅर्डबाॅय पार पाडत आहे. कोविड संसर्गकाळापर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपये पगार म्हणजेच दररोज ८०० रुपये मजुरी मिळत असली तरी ते करीत असलेले काम फारच जोखमीचे आहे. कोरोनाबाधितांच्या मृतदेहाजवळ येण्यास कुटुंबीयसुध्दा हिंमत करत नाही, तिथे हे वाॅर्डबाॅय आपला जीव धोक्यात घालून हे जिकिरीचे काम करीत आहे. हे काम करून घरी जाताना त्यांनासुध्दा आपल्यामुळे कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग तर होणार नाही याची भीती असते. घरी गेल्यानंतरही त्यांना कुटुंबीयांसह न राहता वेगळ्या खोलीत राहावे लागते. या सर्व गोष्टींची काळजी त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावी लागते. हे सर्व काम करण्याची त्यांच्या मनाची तयारी नसली तरी पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना ही सर्व कामे करावी लागतात. बरेचदा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मृतकाचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठीसुध्दा येत नाही. अशावेळी हेच लोक अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडून माणुसकीचा परिचय देतात.

........

पोट भरेल एवढे पैसे तर मिळतात, पण हा रोजगार तात्पुरता

- कोरोनामुळे सर्वच उद्योग-धंदे ठप्प आहेत. त्यामुळे बाहेर मजुरीची किंवा दुसरी कामेसुध्दा मिळत नाही. त्यात तात्पुरते का होईना हे वाॅर्डबाॅयचे काम मिळाले आहे. यातून मिळणाऱ्या मजुरीत पोट जरी भरत असले तरी हा तात्पुरताच रोजगार आहे.

- रुग्णालयातील मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम फारच जोखमीचे आहे. बरेचदा यातून संसर्ग होण्याचीसुध्दा भीती असते, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही सर्व कामे करावी लागतात.

- हे फारच जोखमीचे आहे, मात्र त्या तुलनेत मिळणारा मोबदला फारच अल्प आहे. त्यामुळे शासनाने यात वाढ करून आम्हाला कायमस्वरुपी शासकीय सेवेत सामावून घेतल्यास मदत होईल.

.....

काय असते काम

एखाद्या कोरोनाबाधिताचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाला पीपीई किट तसेच कापडामध्ये व्यवस्थित पॅक करून रुग्णाचे नातेवाईक येईपर्यंत रुग्णालयाचे शवागारात ठेवणे. कुटुंबीय आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवून मृतदेह रुग्णवाहिकेने स्मशानभूमीपर्यंत नेण्याची व्यवस्था करणे, मृतदेह घेऊन जाणाऱ्या मजुरांना योग्य काळजी घेण्याचा सल्ला देणे, सॅनिटायझेशन, मृतकाची नोंद आदी कामे वाॅर्डबाॅयला करावी लागतात. बरेचदा त्यांना मृतकाच्या नातेवाइकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते.

........

मृतदेहाचे पॅकिंग, शिफ्टिंग; तरी कामाचे मोल अल्पच

संसर्गकाळात कोरोनाबाधितांचे मृतदेह हाताळण्याचे काम फार जोखमीचे आहे. हे काम करीत असताना अनेकदा संसर्ग होण्याचासुध्दा धोका असतो. मात्र हे काम करीत असताना कधी स्वत:चे बरेवाईट झाल्यास कसेलच विमा संरक्षण नाही. किमान शासनाने आमचा विमा तरी उतरवावा.

- मेघश्याम, वॉर्डबाॅय

.......

कोरोनाकाळात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्यांना शासनाने ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे. आम्हाला तेवढे नाही पण किमान १० लाखांचे विमा संरक्षण तरी द्यायला हवे, जीव धोक्यात घालून आम्ही हे जोखमीचे काम करीत आहोत. शासनाने याची दखल घ्यायला हवी.

- मनोजकुमार, वाॅर्डबाॅय

......

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या कोरोना रुग्णांचे मृतदेह हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे रुग्णवाहिकेने स्मशानघाटापर्यंत पोहचविण्याचे काम आम्हाला करावे लागते. मात्र या सर्व कामाचा मिळणारा मोबदला फारच अल्प आहे. शासनाने यात वाढ करण्याची गरज आहे.

-मोनू, वाॅर्डबाॅय

.......

कोरोनाकाळापर्यंतच आमची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आमच्या पुढे रोजगाराचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला कंत्राटी तत्त्वावर नेहमीसाठी शासकीय सेवेत सामावून घेण्याची गरज आहे. तसेच आम्हाला विमा संरक्षण देण्याची गरज आहे.

- एकनाथ, वॉर्डबाॅय

Web Title: Those who are generous with their lives and handle the body get a price of Rs. 800

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.