बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांचा पाढा अधिकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:47+5:302021-06-20T04:20:47+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात येत आहे. दररोज नोंद होणाऱ्या बाधित आणि मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात येत आहे. दररोज नोंद होणाऱ्या बाधित आणि मात करणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता केवळ ७५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
शनिवारी (दि.१९) जिल्ह्यात २३ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ५ नवीन रुग्णांची नोंद झाली. एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील १९ दिवसांत कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असून, तीन, चार जिल्हे कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा राज्यात सर्वांत कमी ०.२७ टक्के आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात केवळ ६४ रुग्णांची नोंद झाली, तर दीडशेवर बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने जिल्ह्यात अनलॉक असून, सर्वच व्यवहार आता सुरळीतपणे सुरू करण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १८६४४८ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात १६११६१ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २००११७ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १७९१८४ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४१०७३ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी ४०२९९ बाधितांनी कोरोनावर मात केली. सद्य:स्थितीत ७५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, २२७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.....................
४५४६ नमुन्यांची चाचणी; ५ नमुने आले पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी (दि.१९) एकूण ४५४६ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात १३५९ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ३१८६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ५ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.११ टक्के आहे.
..........
कोरोनाचा रिकव्हरी दर ९८.११
कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. तो राज्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक आहे, तर कोरोनाचा मृत्यूदर १.७३ टक्के आहे.
.................