आधी नकार देणारेच आता धानाला बोनससाठी आग्रही - राधाकृष्ण विखे पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 12:07 PM2022-11-04T12:07:44+5:302022-11-04T12:11:45+5:30

आसोली येथे भाजपचा शेतकरी मेळावा

Those who refused earlier are now insisting on bonus for paddy - Radhakrishna Vikhe Patil | आधी नकार देणारेच आता धानाला बोनससाठी आग्रही - राधाकृष्ण विखे पाटील 

आधी नकार देणारेच आता धानाला बोनससाठी आग्रही - राधाकृष्ण विखे पाटील 

googlenewsNext

गोंदिया : राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी धानाला बोनस देण्यास नकार दिला होता. हवेत उडणाऱ्या नेत्यांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र सत्तेवरून पायउतार होताच त्यांना आता शेतकऱ्यांची आठवण येत आहे. आधी नकार देणारेच आता धानाला बोनसची मागणी करीत असून शेतकऱ्यांच्या नावावर बोनस हडपण्याचा हा त्यांचा डाव आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून बाेनस वितरण प्रक्रियेतील घोळ दूर करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

तालुक्यातील आसोली येथे माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्वात आयोजित शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने प्रफुल्ल अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष केशव मानकर, माजी आ. राजकुमार बडोले, संजय पुराम, हेमंत पटले, रमेश कुथे, माजी जि. प. अध्यक्ष विजय शिवणकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रकाश रहमतकर, भाजप जिल्हा मोर्चा अध्यक्ष भावना कदम, धनलाल ठाकरे, सुनील केलनका व पदाधिकारी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, रब्बी हंगामादरम्यान धान खरेदी झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून निश्चितच कारवाई केली जाईल. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहणार अशी ग्वाही दिली. माजी आ. गोपालदास अग्रवाल म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होऊन तो पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह स्पर्धा करण्यासाठी सक्षम व्हावा. रजेगाव-काटी, तेढवा-शिवणी, नवेगावबांध-देवरी या उपसा सिंचन योजनांमुळे परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय झाली आहे. यावेळी शासकीय धान खरेदी केंद्रावरील लूटमार बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

डांगोर्ली बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार

बाघ नदीवर डांगोर्लीजवळ बंधारा तयार करून पाणी अडवून त्याचा सिंचनासाठी उपयोग करण्यासाठी गोपालदास अग्रवाल हे प्रयत्नरत आहे. बंधार तयार करण्याचा प्रश्न मंत्रालयात चर्चा करून लवकरच मार्गी लावण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच सिंचनासाठी मदत होईल, अशी ग्वाही ना. विखे पाटील यांनी दिली.

Web Title: Those who refused earlier are now insisting on bonus for paddy - Radhakrishna Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.