हजारो शेतकरी धानाच्या चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:35 AM2021-02-17T04:35:11+5:302021-02-17T04:35:11+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी या आधारभूत धान खरेदी केंद्रामधून या परिसरातील शेतकऱ्यांची खरीप हंगामातील धान खरेदी आदिवासी विकास महामंडळाने केली ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी या आधारभूत धान खरेदी केंद्रामधून या परिसरातील शेतकऱ्यांची खरीप हंगामातील धान खरेदी आदिवासी विकास महामंडळाने केली आहे. खरेदीला तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही धानाचे चुकारे महामंडळाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेले नाही. १८ डिसेंबरनंतर धान खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना अजूनही धानाचे चुकारे देण्यास महामंडळ दिरंगाई करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात उपप्रादेशिक अधिकारी नवेगावबांध यांच्याशी संपर्क साधून शेतकरी विचारणा करतात तेव्हा चुकारे आज मिळतील, उद्या मिळतील असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे देण्यास महामंडळ दिरंगाई करीत आहे. बँक खत्यात चुकारे जमा झाले किंवा नाही यासाठी दररोज शेतकरी बँकेत जाऊन चौकशी करीत आहेत; परंतु चुकारे बँकेत जमा न झाल्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. १८ डिसेंबरपूर्वी केलेल्या धान खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. त्यानंतर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे मिळालेले नाहीत.