कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:34 PM2018-05-28T22:34:38+5:302018-05-28T22:34:48+5:30

जिल्ह्यातील ८२ हजारांवर शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. परंतु आतापर्यंत जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेतील मिळून ५० हजारांवर शेतकऱ्यांचीच ग्रीनलिस्ट आली आहे.

Thousands of farmers awaiting debt relief | कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी

googlenewsNext
ठळक मुद्देखरीप हंगाम तोंडावर : कर्जमाफीअभावी पीककर्ज अडले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ८२ हजारांवर शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. परंतु आतापर्यंत जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेतील मिळून ५० हजारांवर शेतकऱ्यांचीच ग्रीनलिस्ट आली आहे. उर्वरित ३२ हजारांवर शेतकºयांना अद्याप कर्जमाफीची प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून ग्रीनलिस्टच जाहीर झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीची माहिती कळत नाही. खरीप हंगाम तोंडावर आला तरी नवीन कर्ज मिळेना, अशा द्विधा अवस्थेत शेतकरी अडकला आहे.
गतवर्षी शेतकºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर राज्य शासनाने जून अखेरीस शेतकऱ्यांना अटी व शर्थीच्या अधीन राहून कर्जमाफीची घोषणा केली. या घोषनेनंतर त्यात सातत्याने बदलणारे निकष, नवीन आदेश आदी कारणांमुळे प्रत्यक्षात पहिली ग्रीनलिस्ट जाहीर होण्यास अडीच ते तीन महिने लागले.
त्यावेळी ओरड वाढल्यानंतर दिवाळीपर्यंत कर्जमाफी शेतकºयांच्या पदरात पडेल, असे ठोक आश्वासन मुख्यमंत्र्यासह सहकारमंत्र्यांनी दिले होते. परंतु ११ महिने लोटले तरी अद्याप ३० टक्के शेतकऱ्यांना आपण कर्जमाफीस पात्र ठरलो की नाही, याबाबत साशंकता कायम आहे. त्यातच आता खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
एकीकडे आॅनलाईन अर्ज करुनही कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमध्ये नाव नाही. दीड महिन्यापासून नवीन ग्रीनलिस्ट जाहीर नाही. त्यामुळे मानगुटीवर कर्जाचा भार कायम आहे. असे असताना बँकांकडून नवीन कर्जासाठी दारातही उभे केले जात नाही.
त्यामुळे खरिपाची पेरणी करायची कशी? असा प्रश्न हजारो शेतकऱ्यांना पडला आहे.
हजारो शेतकरी हवालदिल
डझनभर शासन निर्णय, सूचनापत्रे काढल्यानंतर ग्रीनलिस्ट जाहीर होऊन रक्कमही वर्ग करण्यास प्रारंभ झाले. त्यानुसार दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात आठ महिने झाले तरी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. सुरुवातीला टप्पाटप्याने जाहीर होणारी ग्रीनलिस्ट गेल्या दीड महिन्यापासून जाहीरच झाली नाही. त्यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सरकारसोबत विरोधकही गप्प
सुरुवातीला कर्जमाफीच्या घोषणेनंतर सत्ताधाऱ्यांनी याचा मोठा गाजावाजा केला. त्यानंतर ग्रीनलिस्टला होणारा उशीर व सततच्या बदलत्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली. मात्र सध्या खरिपाचा हंगाम तोंडावर असल्याने कर्जमाफीबाबत अर्ज केलेल्या शेतकºयांना वस्तुस्थिती कळणे गरजेचे आहे. मात्र याबाबत दीड महिन्यापासून प्रक्रिया ठप्प असताना ना सत्ताधारी काही सांगत आहेत ना विरोधक आवाज उठवत आहेत.

Web Title: Thousands of farmers awaiting debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.