रिसामा तलावातील हजारो माशांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 09:21 PM2019-05-30T21:21:31+5:302019-05-30T21:22:41+5:30
तालुक्यातील रिसामा परिसरातील गायत्री मंदिराजवळील तलावातील हजारो मासे अचानक मृत्यूमुखी पडल्याची घटना गुरुवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आली. गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुक्यातील रिसामा परिसरातील गायत्री मंदिराजवळील तलावातील हजारो मासे अचानक मृत्यूमुखी पडल्याची घटना गुरुवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आली.
गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. तालुक्यातील रिसामा परिसरातील गायत्री मंदिर जवळील खाजगी तलाव महापात्र भावंडांनी मागील अनेक वर्षांपासून मासेमारीसाठी लिजवर घेतले आहे. याच व्यवसायावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. शिवाय त्यांच्या या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार सुध्दा मिळाला आहे.
बुधवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास तलाव मासे मृत्यूमुखी पडल्याची माहिती काही नागरिकांना महापात्र बंधुना दिली. त्यांनी मृत्यूमुखी पडलेले मासे बाहेर काढले.मात्र त्यानंतर गुरूवारी सकाळी तलावातील संपूर्ण मासे मृत्यूमुखी पडल्याचे आढळले.
जवळपास ३५ ते ४० क्विंटल मासे मृत्यूमुखी पडल्याने महापात्र बंधूचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. यामुळे तलावातील पाणी सुध्दा दूषीत झाले आहे. या तलावाच्या साठवण क्षमतेच्या तुलनेत सध्या स्थितीत १५ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र यानंतरही मासे मृत्यूमुखी पडल्याने तलावातील पाण्याची तपासणी केल्यानंतरच मासे कशामुळे मृत्यूमुखी पडले याचे कारण स्पष्ट होईल. तज्ज्ञांच्या मते पाणी साठा कमी झाला असता अथवा पाण्यातील आॅक्सीजनचे प्रमाण कमी झाले असता मासे मृत्युमुखी पडतात.
मात्र तलावात सध्या स्थितीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असून यानंतरही मासे मृत्त्युमुखी पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तलावात काहीतरी विषारी रसायन टाकल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचे बोलल्या जाते. मत्स्य व्यवसाय विकास विभागाने याची चौकशी करुन महापात्र बंधूना आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.