हजारो अनुयायांनी केले बाबासाहेबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 11:56 PM2018-04-14T23:56:29+5:302018-04-14T23:56:29+5:30
संविधानाचे रचनाकार डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त शहरातील हजारो बांधवानी आंबेडकर चौकात पोहचून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : संविधानाचे रचनाकार डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त शहरातील हजारो बांधवानी आंबेडकर चौकात पोहचून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
शनिवारी (दि.१४) सकाळी रामनगर येथील डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रॅलीची सुरूवात करण्यात आली. सुर्याटोला, आंबाटोली, सिंगलटोली, रामनगर, आंबेडकर वार्ड, कुंभारेनगर, लक्ष्मीनगर, भीमनगर, श्रीनगर, गौतमनगर, कुंभारटोली होत ही रॅली शहरात पोहचली. त्यानंतर सिंधी कॉलनी, चांदनी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ होत आंबेडकर प्रतिमेजवळ पोहचली. दुसरी रॅली छोटा गोंदियातून गोविंदपूर, संजयनगर, मोठा गोंदिया, गौतमनगर, सिव्हिल लाईन होत मुख्य रॅलीत सहभागी झाली. रॅलीत भीम गीतांवर तरूण नाचत होते.
दरम्यान सुभाष शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपूरचे वक्ता पी.एस. चांगोले यांनी डॉ. आंबेडकर यांच्या गुरूसंदर्भात माहिती दिली.बाबासाहेबांना जाती नसलेला समाज अभिप्रेत होता. मनुष्य मनुष्याशी मनुष्याप्रमाणे वागावे असे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्योतिप्रकाश गजभिये, मंचावर अजाब शास्त्री, नगरसेवक पंकज यादव, प्राचार्य सुनील भजे, लोकेश यादव, विरेंद्रकुमार कटरे, सावन डोये, स्मिता सोनवाने उपस्थित होते.
समता संग्राम परिषदेतर्फे भोजनदान
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समता संग्राम परिषदेकडून सकाळी ८ वाजता तहसील कार्यालय परिसरात डॉ.आंबेडकर प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जातीवादी शासनाचा निषेध केला. दुपारी १२ वाजतापासून समता संग्राम परिषद कार्यालयासमोर भोजनदान सुरू करण्यात आले. रॅलीत सहभागी हजारो नागरिकांनी भोजन केले. सदर कार्यक्रमासाठी संगटनेचे संयोजक प्रा.सतीश बन्सोड, माजी नगराध्यक्ष के.बी. चव्हाण, डॉ.निकोसे, संगटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद मेश्राम, महासचिव राजू राहुलकर, एस.डी. महाजन, रमन सतदेवे, वामन मेश्राम, अॅड. आनंद बोरकर, अॅड. गडपायले, जे.एम. खोब्रागडे, मधू खोब्रागडे, किरण फुले, प्रकाश वासनिक, राजाराम चौरे, के.टी. गजभिये, विनोद मेश्राम, सुनीता भालाधरे, अमन फुले, नरेंद्र बोरकर, प्रफुल लांजेवार, डी.आर. वैद्य, हर्षला वैद्य, डॉ.वियंका वैद्य उपस्थित होते.