वादळाने हजारो घरांची पडझड
By admin | Published: April 7, 2016 01:42 AM2016-04-07T01:42:44+5:302016-04-07T01:42:44+5:30
मंगळवारच्या सायंकाळी वादळासह गारपीट झाली. विजेच्या कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसाने कहर केला.
दुसऱ्या दिवशीही गारपीटने झोडपले : विद्युत खांब, झाड कोलमडून पडले, वीज पडून महिला ठार, बैलही दगावला
गोंदिया : मंगळवारच्या सायंकाळी वादळासह गारपीट झाली. विजेच्या कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसाने कहर केला. या वादळात चान्ना येथील ४००, बाक्टी ४९५ घरांची व पठाणटोला येथील ८० असे एकूण हजारो घरांचे नुकसान झाले. वीज पडून एक महिला व एक बैल ठार झाला आहे.
बोंडगावदेवी : मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता आलेल्या वादळी पावसात गारपीटने झोडपले. गारपीटच्या तडाख्याने चान्ना/बाक्टी येथील घरांची पडझळ झाली आहे. यात मोठ्या प्रमाणात नुकसाने सरपंच मोरेश्वर सोनवाने, जितेंद्र शेंडे यांनी सांगितले.
चान्ना येथे वादळी पावसासह गारपीट झाली. गावात दीडशे एकर रबी धानाची लागवड करण्यात आली आहे. संपूर्ण पीकाची नासाडी झाली आहे. गावातील झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. रामलाल लांडगे यांच्या घरावर आंब्याचा झाड कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावातील ४ विद्युत पूर्णत: उखडले, तारा तुटून पडल्या. गावातील जवळपास २५ झाडे पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मेडीकल मधील टीनपत्रे उडाले. चान्ना येथील ४०० घरावरील कवेलू फुटले. बाक्टी गावामध्ये वादळी पावसासह गारपीटीने अक्षरश: झोडपून काढले. ग्रामपंचायत कार्यालयाचे नुकसान झाले. येथील ४९५ घरांची, कवेलूची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गावातील ७ विद्युत खांब पूर्णत: कोसळून पडले. ५.३० वाजता वादळी पावसाने कहर माजवला. १५ मिनिटे आवळा ऐवढी गार पडल्याने घरावरील कवेलुचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रमेश सांगोळे यांच्या किराणा दुकानावरील कवेलू फुटल्याने दुकानामधील लाखो रुपयांच्या किरणा सामानाचे नुकसान झाले. प्रमोद बोरकर यांच्या घराजवळील ५० वर्षाचा वडाचे झाड मुळासकट पडल्याने घराची व ट्रॅक्टर ट्रालीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. ओमकांता चाचेरे या विधवा महिलेच्या घरावरील कवेलुचा चुराडा झाल्याने स्वयंपाक घरात पाणी शिरले. दोन्ही गावात कोट्यवधीचे नुकसान झाले. मुंंगली येथील मंजुळा बाबुराव राऊत (५५) या महिलेवर वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डी.सी. बाम्बोर्डे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
निंबा (तेढा) : ग्रामपंचायत निंबा अंतर्गत येणाऱ्या ग्राम पठाणटोला येथे मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. या गावात एकूण ८० घरे आहेत. त्यातून अनेक घरे जमीनदोस्त झाली. अनेक घरांचे कवेलू व सिमेंट शिट, टिनाची पत्रे घरावरुन उडाली. त्यामुळे अवकाळी आलेला पाऊस घरात शिरला त्यात घरातील तांदूळ, गहू व अन्य खाद्यपदार्थ, घरातील सामान खराब झाले. उघड्यावर आलेल्या ८० कुटंबानी कुठे रहावे हा प्रश्न उदभवला आहे. चक्रीवादळामुळे विजेचे खांब पडल्याने गावात वीज नाही. अशा प्रकारे या गावातील गरीब मजूर व शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे यांचा राहण्याचा व उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांना आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी तलाठी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दिली. परंतु आज (दि.६) १२ वाजतापर्यंत महसूल विभागाचे कोणतेही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. तहसीलदार गोरेगाव यांनी या घटनेची आपल्या स्तरावर चौकशी करुन गरीब मजूर व शेतकऱ्यांचा झालेले नुकसान ताबडतोड मंजूर करुन या शेतकऱ्यांना व मजुरांना राहण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी मदत करण्यात यावी, अशी मागणी पुरुषोत्तम कटरे, उपसरपंच ग्रामपंचायत निंबा यांनी केली आहे. बाराभाटी जवळील कवठा ( बोळदे) येथील शेतकरी दिगांबर वासुदेव मडावी यांच्या गोठ्यामध्ये ३ बैल बांधले होते. यावेळी त्यांच्या गोठ्यावर वीज पडून बैल जागीच मरण पावला. याची तक्रार तलाठी देवलगाव याच्याकडे करण्यात आली. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी मडावी यांनी केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)