लाखोंची औषधी जंगल शिवारात फेकली
By admin | Published: November 29, 2015 02:36 AM2015-11-29T02:36:29+5:302015-11-29T02:36:29+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या अररतोडी/परसटोला येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ...
कृषी विभागाचा प्रताप : शेतकऱ्यांना वाटप झालीच नाही?
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या अररतोडी/परसटोला येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिरची व भाजीपाला पिकावर फवारण्यासाठी वाटप करण्यात येणारी लाखो रुपयांची औषधी शेतकऱ्यांना वाटप न करता कृषी सहायक औरासे व कृषीमित्र सुदाम कोवे यांनी जंगल शिवारात बेवारस फेकून दिली. बीट क्रमांक ८५२ मध्ये घडलेल्या या अफलातून प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सरपंच मनिषा साखरे यांनी फेकलेल्या औषधीचा पंचनामा करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषीविषयक चांगल्या योजना राबवून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु कृषी विभागातील काही अधिकारी व कर्मचारी कर्तव्य न बजावता शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ करीत असतात. अरततोंडी/परसटोला येथे घडलेला प्रकार अशाच प्रकारामधील आहे.
मिरची व भाजीपाला पिकावर फवारण्यासाठी शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणारी रुची एक्झाडिरेक्टीव्ह, रुची सायडर, आरबीपीएसबी, रुची बीबीसी, रुची फ्लोरेसेन्सपी या लाखो रुपयांच्या औषधीचे पॅकेट, बॉटल शेतकऱ्यांना वाटप न करता जंगल शिवारात फेकून दिल्याचा अफलातून प्रकार कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी केला.
या प्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी तुमडाम आणि कृषी मंडळ अधिकारी नवेगाव(बांध) यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. सरपंच आणि गावातील नागरिकांनी कृषी मित्राच्या घरी गोठ्यात ठेवण्यात आलेल्या व फेकण्यात आलेल्या औषधीचा पंचनामा करून या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
परसटोलाचे सरपंच यांंनी या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशन केशोरीला देऊन संबंधीत व्यक्तीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)