गोंदिया जिल्ह्यात कटंगी धरणानजीक शेकडो पोपट मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:37 PM2020-03-14T12:37:45+5:302020-03-14T12:38:51+5:30
गोरेगाव तालुक्यात गुरूवारी (दि.१२) आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कटंगी धरणाजवळ शेकडो पोपटांचा मृत्यु झाल्याची बाब उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिलीप चव्हाण
गोंदिया: गोरेगाव तालुक्यात गुरूवारी (दि.१२) आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कटंगी धरणाजवळ शेकडो पोपटांचा मृत्यु झाल्याची बाब उघडकीस आली आहे. शनिवारी (दि.१४) सकाळी वन विभागाचे कर्मचारी आणि निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी कटंगी धरणाजवळ पोहचून याची पाहणी केली. तसेच काही जखमी असलेल्या पोपटांना प्राथमिक उपचारासाठी वन विभागाच्या स्वाधीन केले.
येथील कंटगी धरणाजवळ वनविभागाच्या सागवान नर्सरी परिसरात गुरूवार आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वादळी पाऊस आणि गारपीट झाली.याचा तडाखा नर्सरी परिसरात वास्तव्यास असलेल्या पोपटांना बसला.गारपिटीमुळे शेकडो पोपटांचा मृत्यु झाल्याने नर्सरी परिसरात मृत पोपटांचा अक्षरक्ष: सडा पडला होता. कटंगी धरणाजवळ वनविभागची पन्नास एकरात सागवान झाडांची नर्सरी आहे. या नर्सरीत दीड लाखांहून अधिक वेगवेगळ्या प्रजातीच्या पोपटांचे वास्तव्य होते असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गोरेगाव तालुक्यात १२ व १३ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा या परिसरात वास्तव्यास असलेल्या पोपटांना बसला. वादळी वारा व गारिपटीमुळे जवळपास दहा हजार पोपटांना जिव गमवावा लागला. पूर्वी या ठिकाणी लाखो पक्ष्यांची किलिबल ऐकू येत होती. गारपिटीमुळे ही किलबिलसुध्दा कमी झाली.शनिवारी (दि.१४) सकाळी आठ वाजता निसर्ग मंडळाच्या सदस्य व वनविभागाने आठ तास मृत्युमुखी पङलेल्या पोपटांना एका जागी एकत्र करून त्याची रितसर विल्हेवाट लावली. मृत्युमुखी पडलेल्या पोपटांमुळेही संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोपट मृत्युमुखी पडल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे वन्यजीव प्रेमीत हळहळ व्यक्त केली जात आहे. या वेळी निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, अमित रहांगडाले, गुड्डू कटरे, बाबा चौधरी व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
कुठे गेले दीड लाख पोपट
कटंगी धरण परिसरातील नर्सरीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यात असलेल्या पोपटांना पाहण्यासाठी निसर्ग मित्राची गर्दी इथे पाहयला मिळायची.एकीकडे कटंगी जलाशय तर दुसरीकडे निसगार्चा अप्रतिम देखावा विविध प्रजातीचे पक्षी या जलाशयात अवतीभवती वावरतांना दिसत होते. त्यामुळे या परीसरात पर्यटकांची गर्दी पहायला मिळत होती.
गारपीट व वादळी वाऱ्याचा मोठ्या प्रमाणात फटका पोपटांना बसला. गारपिटीमुळे शेकडो पोपट मृत्युमुखी पडले असून अनेक पक्षी जखमी झाले आहे. जखमी पोपट आणि पक्ष्यांवर प्राथमिक उपचार करुन जंगलात सोडण्यात येईल. मृत्युमुखी पडलेल्या पोपटांची विल्हेवाट लावण्यात येईल.
- प्रवीण साठवने, वनपरिक्षेत्राधिकारी गोरेगाव.