वाघाच्या शिकार प्रकरणातील तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 05:00 AM2020-11-28T05:00:00+5:302020-11-28T05:00:18+5:30
गोंदिया वनविभागांतर्गत मुंडीपार सहवनक्षेत्रातील चुटिया नियतक्षेत्रात येत असलेल्या लोधीटोला येथील शेतात १५ नोव्हेंबर रोजी वाघ मृतावस्थेत आढळला. या वाघाच्या शिकारीचा तपास १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला. गोंदिया वनविभागाचे श्वान पिटर व नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र येथील श्वान रामू यांच्या मदतीने घटना स्थळाची तपासणी करुन गुन्ह्यातील पुरावे गोळा केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील लोधीटोला येथील शेतशिवारात वाघाची करंट लावून शिकार करणाऱ्या तिघांना वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. त्या आरोपींनी वाघाची शिकार केल्याचे कबूल केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
गोंदिया वनविभागांतर्गत मुंडीपार सहवनक्षेत्रातील चुटिया नियतक्षेत्रात येत असलेल्या लोधीटोला येथील शेतात १५ नोव्हेंबर रोजी वाघ मृतावस्थेत आढळला. या वाघाच्या शिकारीचा तपास १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला. गोंदिया वनविभागाचे श्वान पिटर व नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र येथील श्वान रामू यांच्या मदतीने घटना स्थळाची तपासणी करुन गुन्ह्यातील पुरावे गोळा केले. मृत वाघाचे अवशेष आढळलेल्या शेतकऱ्यांना व इतर संशयीत इसमाना या प्रकरणात चौकशीकरीता उपवनसंरक्षक कार्यालय गोंदिया येथे बोलवून बयान नोंदविण्यात आले. अखेर चौकशी दरम्यान रोशनलाल खेमलाल बघेले व मुकेश रोशनलाल बघेले दोन्ही रा. लोधीटोल, बालचंद सोनू राणे रा.चुटिया यांनी करंट लावून वाघाची शिकार केल्याचे तपासात आढळूण आले आहे. आरोपी मुकेश याने २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शेतशिवारात ज्याठिकाणी वाघ मारला ते ठिकाण दाखविले. त्यानंतर ज्यामार्गाने ज्याठिकाणी मृत वाघाचे अवशेष तुकडे टाकले ते ठिकाण दाखविले. मुकेशने वाघाचे तुकडे करण्याकरीता वापरलेली कुऱ्हाड स्वत:च वनाधिकाऱ्यांना दिली. मुकेश व रोशनलाल यांना प्रथम श्रेणी,न्यायदंडाधिकारी गोंदिया यांचे समोर २६ नोव्हेंबर रोजी हजर करण्यात आले होते.
न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडीचे आदेश दिले होते. आरोपी बालचंद सोनू राणे याला २६ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले २७ नोव्हेंबर रोजी सर्व आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत वन कोठडी सुनावली आहे. या कारवाईसाठी लोधीटोलाचे पोलीस पाटील इंदुबाई रहांगडाले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गजानन कावळे व मानद वन्यजिव रक्षक मुकुंद धुर्वे यांनी सहकार्य केले. ही कारवाई उपवनसंरक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक आर.आर. सदगीर, वनक्षेत्राधिकारी एस.के.आकरे, वनक्षेत्रपाल एस.एस.म्हसकर,क्षेत्र सहाय्यक एस.आर.श्रीवास्तव ,बी.डी. दखने, एस.जे.दुर्रानी, एल.एस.अग्नीहोत्री, जे.एन. फटींग,आर.जे. भांडारकर, एन.पी. वैद्य यांनी केली आहे.