रेल्वेच्या सिग्नलचे रिले चोरी करणारे तीनजण जाळ्यात; गंगाझरी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाची संयुक्त कारवाई

By नरेश रहिले | Published: October 18, 2023 02:50 PM2023-10-18T14:50:58+5:302023-10-18T14:51:23+5:30

पोलिसांच्या सतर्कतेने रेल्वेचा मोठा अपघात टळला

Three arrested for stealing railway signal relay; Joint operation of Gangazhari Police and Railway Security Force | रेल्वेच्या सिग्नलचे रिले चोरी करणारे तीनजण जाळ्यात; गंगाझरी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाची संयुक्त कारवाई

रेल्वेच्या सिग्नलचे रिले चोरी करणारे तीनजण जाळ्यात; गंगाझरी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाची संयुक्त कारवाई

गोंदिया : गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दांडेगाव येथील लेव्हल रेल्वे क्रॉसिंग गेट ५१५ येथील रिले रूमचे कुलूप तोडून रेल्वे रॅक मधील ४१ रिले चोरी करणाऱ्या तिघांना गंगाझरी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी संयुक्तरीत्या कारवाई करून अटक केली. ही कारवाई १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. सलाम रफिक शेख (२४), जितेंद्र ऊर्फ जितू नरेंद्र गिरी (३४), ऋषभ ऊर्फ सोनू शशिकांत सिंह (२४) सर्व रा. गंगाझरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सोबतच एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले.

प्राप्त माहितीनुसार १४ ऑक्टोबर रात्री ११:३० वाजताच्या सुमारास चोरट्यांनी लेव्हल रेल्वे क्रॉसिंग गेट ५१५, दांडेगाव येथील रिले रूमचे कुलूप तोडून रेल्वे रॅक मधील ४१ रिले किंमत ९८ हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. या आरोपींवर गोंदिया रेल्वे सुरक्षा बल येथे आरोपींवर रेल्वे मालमत्ता (अवैध ताबा) कायदा १९६६ कलम ३ (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन गंगाझरीचे पोलिस निरीक्षक महेश बन्सोडे, सहायक फौजदार मनोहर अंबुले, पोलिस हवालदार सुभाष हिवरे, भूपेश कटरे, पोलिस शिपाई प्रशांत गौतम, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील, नंदबहादूर, विनोदकुमार तिवारी, पोलिस उपनिरीक्षक राहुल कुमार, दुबे, मेश्राम, सहायक फौजदार एस. सिडाम, पोलिस हवालदार रायकवार, पोलिस शिपाई नसीर खान यांनी केली. घटनास्थळाला रेल्वे सुरक्षा बलाचे डी.आय.जी भवानी शंकरनाथ व मंडल सुरक्षा आयुक्त आर्य यांनी भेट दिली.

वाहतूक व्यवस्था खोळंबली

रेल्वेच्या महत्वपूर्ण सिग्नल प्रणालीच्या रिले चोरीच्या घटनेमुळे काही काळाकरिता हावडा - नागपूर रेल्वे मार्गावरील रेल्वेची वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. या कृत्यामुळे रेल्वेची मोठी दुर्घटना होता होता थोडक्यात टळली.

रिलेचे कार्य काय?

रिले हे रेल्वेच्या सिग्नल प्रणालीमध्ये वापरले जातात. त्याच्यामुळे सिग्नलचे कार्य चालू राहते. परंतु ते रिले सिस्टीम मधून काढल्यामुळे रेल्वेचे सर्व सिग्नल बंद पडले. यामुळे एखादी मोठी रेल्वे दुर्घटना घडून त्यात मोठी जीवित किंवा वित्तहानी झाली असती. परंतु रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या निर्देशानुसार गंगाझरीचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी तत्परतेने चोरट्यांबद्दल माहिती संकलित करून गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

नागरिकांना आवाहन

रेल्वेच्या मालमत्तेची किंवा त्याच्या वेगवेगळ्या साहित्याची चोरी करणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारच्या रेल्वेच्या साहित्याच्या चोरीमुळे रेल्वेची मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेची चोरी केल्याचे वा करताना आढळून आल्यास त्याबद्दल तत्काळ गोंदिया रेल्वे पोलिसांना तसेच गोंदिया जिल्हा पोलिसांना माहिती देणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. जिल्ह्यांतील सुज्ञ नागरिकांनी नियंत्रण कक्ष गोंदिया दूरध्वनी क्रमांक ०७१८२-२३६१०० यावर किंवा डायल ११२ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.

Web Title: Three arrested for stealing railway signal relay; Joint operation of Gangazhari Police and Railway Security Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.