त्याच्यासाठी ठरली 'ती' शेवटची सकाळ, मुलींवर कोसळले दुःखाचे आभाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 03:39 PM2021-11-15T15:39:47+5:302021-11-15T16:54:20+5:30

शेजारच्या मातीच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर अचानक कोसळली आणि चंद्रप्रकाशचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबाची दिवाळी तर शोकमय अंधारात गेली. परंतु त्यांच्या तीन मुलींच्या वाटेवर अंधारच अंधार दिसून येत आहे.

Three daughters orphaned by father's death | त्याच्यासाठी ठरली 'ती' शेवटची सकाळ, मुलींवर कोसळले दुःखाचे आभाळ

त्याच्यासाठी ठरली 'ती' शेवटची सकाळ, मुलींवर कोसळले दुःखाचे आभाळ

googlenewsNext
ठळक मुद्देवडिलांच्या मृत्यूने तिघ्या बहिणींच्या वाटेत अंधारपोवारीटोला-कोटजमुरा येथील घटना

गोंदिया : सालेकसा तालुक्यातील पोवारीटोला-कोटजमुरा येथील गरीब शेतमजूर चंद्रप्रकाश रूपचंद दमाहे (४२) यांच्यासाठी दिवाळीच्या एक दिवसापूर्वीची १ नोव्हेंबरची सकाळ शेवटची सकाळ ठरली. शेजारच्या मातीच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर अचानक कोसळली आणि चंद्रप्रकाशचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबाची दिवाळी तर शोकमय अंधारात गेली. परंतु काळाने अशी झडप घातली की चंद्रप्रकाश दमाहे यांच्या तिन मुलींच्या वाटेवर अंधारच अंधार दिसून येत आहे.

शेतमजुुराची कामे करून आपल्या कुटुंबाचा गाडा खेचणाऱ्या चंद्रप्रकाशला तीन मुलीच असून त्या मुुलींना चांगले शिक्षण द्यावे व मोठे करावे, असे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी तो रात्रंदिवस झटत होता. परंतु देवाला आणखी काही मंजूर असावे असेच म्हणावे लागेल. १ नोव्हेंबर रोजी गावात सर्वत्र दिवाळी साजरी करण्याची पूर्वतयारी सुरू असताना चंद्रप्रकाश नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे जाण्यासाठी घरून निघाले. घरापासून अगदी काही पावलांवरच रस्त्यालगत महेश सहारे यांच्या जीर्ण घराची भिंत चंद्रप्रकाश यांच्या अंगावर पडली व जागीच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे दमाहे कुटुंबाला एकच हादरा बसला.

गरीब शेतमजूर असलेल्या दमाहे कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून गावातील काही लोकांनी घरमालकावर दबाव टाकण्याच्या प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी चंद्रप्रकाशचा मृतदेहसुद्धा त्याच्या घरासमोर नेऊन ठेवला; परंतु याला काहीच अर्थ राहिला नाही. पोलिसांनी चंद्रप्रकाशचा मृतदेह उचलून अंत्यसंस्कार करण्यास लावले. यामुळे त्यांच्या कुटुंबाला जी काही थोडी फार मदत मिळणार होती ती सुद्धा मिळाली नाही.

चंद्रप्रकाशच्या या अपघाती निधनाने त्यांच्या मुली यशवनी दमाहे (१६), प्राची दमाहे (११) आणि कांचन दमाहे (८) अनाथ झाल्या आहेत. चंद्रप्रकाशची पत्नी गुणेश्वरी (३७) ही सतत आजारी राहत असून तिला कोणतेही काम करणे जमत नाही. यामुळे त्यांचे पुढील जीवन फारच कठीण झाले आहे. चंद्रप्रकाशच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. तिला यशवनी ही मुलगी असून ती आता दहाव्या वर्गात शिकत आहे. चंद्रप्रकाशने नंतर दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीलाही दोन मुलीच झाल्या. यात प्राची पाचव्या वर्गात तर कांचन तिसऱ्या वर्गात शिकत आहे. शाळा शिकत असताना त्यांना पुढे काय करावे आणि काय नाही, याबद्दल मुळीच ज्ञान नाही.

भेट नाही अन् मदतही नाही

दमाहे कुटुंबावर दिवाळीच्या दिवशी संकटाचे एवढे मोठे आभाळ कोसळले असूनसुद्धा गावातील प्रमुख जबाबदार व्यक्तींनी त्यांच्या घरी येऊन मदत तर दिलीच नाही. शिवाय कुटुंबाचे सांत्वनसुद्धा करायला भेट दिली नाही. एवढेच नाही तर लोकप्रतिनिधींनी १५ दिवस लोटूनसुद्धा दमाहे कुटुंबाला मदत देण्यासाठी कसलीही पावले उचलली नाही व भेट देणेसुद्धा जरुरी समजले नाही. त्यामुळे पोवारीटोला गावात लोकप्रतिनिधीं व अधिकाऱ्यांबद्दल कमालीचा रोष आहे.

कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज

चंद्रप्रकाश दमाहे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कुटुंबाला दोन वेळचे जेवण दुर्लभ झाले आहे. तिघा मुुलींचे अख्खे आयुष्य समोर उभे असून त्यांना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. अशात शासन तसेच लोकप्रतिनिधींनी मुलींच्या भविष्यासाठी मदतीचा हात पुढे करून त्यांच्या जीवनात थोडाफार प्रकाश आणण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.

Web Title: Three daughters orphaned by father's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.