तीन दिवस सोसाट्याचा वारा अन् गारपिटीचे! रब्बी पिकांना धोका, आरोग्याच्या तक्रारी वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

By कपिल केकत | Published: February 24, 2024 08:36 PM2024-02-24T20:36:13+5:302024-02-24T20:43:20+5:30

परिणामी शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांचेही टेन्शन वाढले आहे.

Three days of gusty wind and hail Danger to Rabi crops, health complaints will increase; Weather forecast | तीन दिवस सोसाट्याचा वारा अन् गारपिटीचे! रब्बी पिकांना धोका, आरोग्याच्या तक्रारी वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

तीन दिवस सोसाट्याचा वारा अन् गारपिटीचे! रब्बी पिकांना धोका, आरोग्याच्या तक्रारी वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

गोंदिया : एकीकडे उकाडा वाढत असून उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच आता हवामान खात्याने पुढील तीन दिवस सोसाट्याचा वारा व गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून ढगाळ वातारण निर्माण होत असल्याने तापमानात घट झालेली आहे. त्यात आता गारपीट व पावसामुळे पिकांना धोका निर्माण होणार असून बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या वाढतील. परिणामी शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांचेही टेन्शन वाढले आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच थंडीचा जोर कमी झाला असून उकाडा वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून तर तापमान ३३ अंशावर जात आहे. यावरून मार्च महिन्यातील स्थितीचा अंदाज लावूनच अंगाला घाम फुटत आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यात १० व ११ तारखेला बरसलेल्या अवकाळी पावसामुळे काही दिवस उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. तर आता हवामान खात्याने २५, २६ व २७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात गारपीट व सोसाट्याचा वारा सुटणार असा अंदाज वर्तविला आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याचा हा अंदाज विदर्भात सर्वच जिल्ह्यांसाठी वर्तविण्यात आला आहे. तर त्यानुसार, मधामधात ढग दाटून येत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

हवामान खात्याचा अंदाज माहिती होताच शेतकरी व सर्वसामान्यांचे ही टेन्शन वाढले आहे. कारण, गारपीट, सोसाट्याचा वारा व पाऊस झाल्यास रब्बी पिकांना त्यापासून धोका निर्माण होणार आहे. तर पाऊस बरसल्यास वातावरणात परत एकदा बदल होणार व आरोग्याच्या तक्रारी वाढणार यात शंका नाही. अगोदरच सर्दी, खोकला व तापाने जिल्हावासी त्रस्त आहेत. त्यात आता परत पाऊस बरसल्यास त्यात आणखी भर पडणार आहे. यामुळे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरतो की काय याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

हरभरा व गव्हाला धोका
- जिल्ह्यात सध्या १६०० हेक्टरमध्ये गहू आणि ५७०८ हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची लागवड करण्यात आली आहे. गव्हाचे पीक फुलोरा ते दाण्याच्या दुधा अवस्थेत आले आहे. तर हरभरा सुद्धा दाण्यावर आला आहे. अशात गारपीट व सोसाट्याचा वारा तसेच पाऊस झाल्यास मात्र गहू व हरभरा जमिनीवर लोळणार व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यासह अन्य पिकांनाही धोका निर्माण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन परत एकदा वाढले आहे.

ढगाळ वातावरणाने पारा घसरला
- मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ अंशावर गेले होते. मात्र आता ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरले असून ३० अंशावर आले आहे. सध्या सकाळी व रात्री थंडी जाणवत असून दुपारी मात्र उकाडा वाढत आहे. वातावरणातील हा बदल लहान व वृद्धांसाठी नव्हे तर तरूणाईसाठी सर्दी, खोकला व तापाने ग्रासत आहे.
 

Web Title: Three days of gusty wind and hail Danger to Rabi crops, health complaints will increase; Weather forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान