बलात्कार प्रकरणातील पळून जाणारे तीन आरोपी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:10+5:302021-06-09T04:37:10+5:30
गोंदिया : झारखंड राज्यातील बलात्कार प्रकरणातील तीन आरोपी रेल्वेने पळून गेल्याची माहिती लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांना मिळाली. ...
गोंदिया : झारखंड राज्यातील बलात्कार प्रकरणातील तीन आरोपी रेल्वेने पळून गेल्याची माहिती लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांना मिळाली. याच अनुषंगाने सर्वत्र अलर्ट घोषित करण्यात आला. दरम्यान, गोंदिया रेल्वे स्थानकावर आरपीएफ व जीआरपीएफ पोलीस नजर ठेवून होते. त्यांनी तपासणी सुद्धा सुरू केली. दरम्यान, हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस गोंदिया रेल्वे स्थानकावर सोमवारी (दि. ७) सायंकाळी दाखल झाल्यावर पळून जाणाऱ्या तिन्ही आरोपींना जीआरपीएफ व आरपीएफच्या पोलिसांनी पकडले.
अटक केलेल्या आरोपींमध्ये राजेश भीम मंडल (२१), राधेश्याम ऊर्फ लेखो लक्ष्मण मंडल (२४) व विजय बिरजू मंडल (२०, सर्व रा. सिरी. जिल्हा देवघर, झारखंड) यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार झारखंड राज्यातील देवघर पोलिसांनी फोनद्वारे जीआरपीएफ आणि आरपीएफ पोलिसांना बलात्कार प्रकरणातील तीन आरोपी हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसने सुरत येथे पळून जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे या गाडीवर लक्ष ठेवून या आरोपींना ताब्यात घेण्यास सांगितले. माहिती मिळताच सोमवारी जीआरपीए आणि आरपीएफ पोलिसांनी रेल्वे स्थानकावर पोलीस अधीक्षक एस. एम. राजकुमार आणि पंकज चुघ यांच्या मार्गदर्शनात पाळत ठेवली. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस दाखल होताच रेल्वे गाडीच्या डब्यांची तपासणी केली. त्यात तिन्ही आरोपी आढळले. त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गोंदिया रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. तसेच याची माहिती देवघर पोलिसांना देण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, पंकज चुघ, वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदबहादूर यादव, सहायक पोलीस निरीक्षक अनिल पाटील, संदीप गोंडाणे, प्रवीण भिमटे व कर्मचाऱ्यांनी केली.