आमगाव तालुक्यातील तीनशे कुटुंब अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 10:15 PM2017-12-08T22:15:29+5:302017-12-08T22:15:44+5:30
आमगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्राहकांना डिमांड भरल्यानंतरही विद्युत मीटर उपलब्ध करुन देण्यात आले नाही.
आॅनलाईन लोकमत
आमगाव : आमगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्राहकांना डिमांड भरल्यानंतरही विद्युत मीटर उपलब्ध करुन देण्यात आले नाही. परिणामी तालुक्यातील तिनशे कुटुंबाना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
शासनाच्या उर्जा विभागाच्या धोरणाअंतर्गत नागरीकांना विद्युत जोडणी त्वरीत मिळावी. यासाठी अर्जाची किचकट अट आणि नियम शिथील करुन विद्युत जोडणी त्वरीत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे तिनशे कुटुंबाना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. एकीकडे याच विभागातर्फे वीज चोरीला आळा घालण्यासाठी त्वरीत वीज जोडणी करुन देण्याची मोहीम राबविली जात आहे. तर दुसरीकडे मात्र याच विभागाच्या दप्तर दिंरगाईचा वीज ग्राहकांना फटका बसत असल्याचे चित्र आहे. आमगाव तालुक्यातील काही गावांमधील वीज ग्राहकांना वीज जोडणी करुन देण्यात आली. तर जवळपास ३०० ग्राहकांना डिमांड भरुन देखील विद्युत मीटर देण्यात आले नाही. परिणामी या ग्राहकांना वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या पायºया झिजवाव्या लागत आहे. विद्युत मीटर बंद असणे, मीटर जलद गतीने फिरणे, मीटर बंद असून देखील रिडिंगमध्ये वाढ होणे आदी समस्यांमुळे वीज ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
वीज वापरापेक्षा अधिक देयकाचा भरणा ग्राहकांना करावा लागत आहे. परंतु फाल्टी मीटर बदलण्याचे काम अद्यापही वीज वितरण कंपनीने सुरू केले नाही. नवीन विद्युत जोडणी मागणी करणाºया ग्राहकांना विद्युत मीटरचा स्टॉक उपलब्ध नसल्याचे सांगत जोडणी करुन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे डिमांड भरुनही त्यांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
शासनाकडून विद्युत मीटरची खरेदी झाली नसल्याने विभागात नवीन विद्युत मीटर उपलब्ध नाहीत. मीटरची मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध होताच पुरवठा करण्यात येईल.
- सरोज परिहार,
उपविभागीय अभियंता विद्युत वितरण विभाग आमगाव.