शहरातील तीन सराईत गुंडांना तीन महीन्यासाठी केले तडीपार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 11:07 PM2024-08-02T23:07:46+5:302024-08-02T23:07:58+5:30
सण उत्सवाच्या निमीत्ताने शहर पोलिसांची कारवाई: गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्ह्यातून केले तडीपार.
नरेश रहिले, गोंदिया: गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य लोकांचे मनात दहशत, भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गोंदिया शहरातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला भयमुक्त जिवन जगता यावे याकरीता गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षकांनी तिन्ही सराईत गुंडांना गोंदिया, भंडारा, आणि बालाघाट जिल्हयातून तडीपार करण्याकरीता कलम ५६ महाराष्ट्र पोलीस अधिनीयमान्वये उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी पर्वणी पाटील यांनी प्रस्तावाची शहानिशा व चौकशी करून त्या तिघांना तडीपार केले.
अमित ऊर्फ गुलशन महेंद्रसिंग चिंडाले (२६), सुमित महेन्द्रसिंग चिंडाले (२८) दोन्ही रा. दसखोली मरघट रोड गोंदिया व शुभम ऊर्फ हग्णू ऊर्फ मास जनुजी चौधरी (२०) रा. सुंदरनगर, गोंदिया अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना २९ जुलै रोजी तीन महिन्याकरीता गोंदिया, भंडारा व बालाघाट या जिल्हयातून तडीपार केले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, दिनेश लबडे, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर, प्रकाश गायधने ,दुर्गेश तिवारी, दिनेश बिसेन, पोलीस हवालदार निशिकांत लोंदासे यांनी कारवाई केली आहे.
या आरोपींची ही पार्श्वभूमी
आरोपी अमित ऊर्फ गुलशन महेंद्रसिंग चिंडाले याच्या विरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, सामूहीक बलात्कार, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा घालण्याची पूर्व तयारी, लोकसेवकावरील हल्ल्ला, इच्छापूर्वक दुखापत, अवैध शस्त्र बाळगणे, दरोडा, अपहरण, दुखापत, नुकसान काम आगळीक करणे, धमकी, समान उद्देश, विनयभंग या सारखे १२ गंभीर गुन्हयांची नोंद आहे. आरोपी सुमित महेन्द्रसिंग चिंडाले याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे घरफोडी, घरातील चोरी, दरोडा, चोरी, दुखापत, नुकसान करून आगळीक करणे, धमकी देणे या सारखे ६ गंभीर गुन्हे, आरोपी शुभम ऊर्फ हग्णू ऊर्फ मास जनुजी चौधरी (२०) याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे घरफोडी, चोरी, गैरकायद्याची मंडळी, दुखापत, खुनाचा प्रयत्न, खून, अवैध शस्त्र बाळगणे या सारखे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.