तरुणीला पळविणाऱ्या तिघांची तुरुंगात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:18+5:302021-07-22T04:19:18+5:30
मंडला-कायखेडा येथील प्रकाश ग्यानी यादव (२१) याने माणिकपुरा मंडला येथील एका १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून ...
मंडला-कायखेडा येथील प्रकाश ग्यानी यादव (२१) याने माणिकपुरा मंडला येथील एका १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथे आणले होते. ते दोघेही पळून आल्यावर पोट भरण्यासाठी त्याला कामाची गरज असल्याने एका अनोळखी इसमाने त्या दोघांना काम देण्याच्या नावावर गोंदिया येथे चला तुम्हाला काम मिळवून देतो, असे बोलून गोंदियात आणले. त्या मुलीला गोंदियातील एका महिलेने मध्य प्रदेशच्या घोटी येथील छन्नुलाल नागपुरे (४२) याच्या घरी नेले.
त्या मुलीला रायपूरवरून गोंदियापर्यंत आणण्याचे काम कोमलप्रसाद बागळे (३४, रा. किन्ही, मध्य प्रदेश) याने केले होते. गोंदिया रेल्वेस्थानकावरून घोटी (मध्य प्रदेश) येथे त्या मुलीला नेणारी आरोपी गोंदियाच्या संजयनगरातील संगीता गोपाल यादव (३०) ही आहे. या तिघांना शहर पोलिसांनी १६ जुलै रोजी अटक करून आरोपींवर भादंविच्या कलम ३६५, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तिला राजस्थान किंवा हरियाणात विक्री करण्याचा डाव होता. परंतु, शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो डाव हाणून पाडला. गोंदियाच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्या आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे, सायबर सेलचे दीक्षित दमाहे, प्रकाश गायधने, चौधरी, योगेश बिसेन, ओमप्रकाश मेश्राम यांनी केली आहे.