टीप्परच्या धडकेत तीन ठार, दोन जण गंभीर; लग्नावरुन परत येताना भीषण अपघात
By नरेश रहिले | Published: April 1, 2023 05:57 PM2023-04-01T17:57:35+5:302023-04-01T18:16:54+5:30
मृतकांमध्ये बापलेकांचा समावेश : भागवतटोला येथील घटना : एकाच दुचाकीवर होते ५ जण स्वार
नरेश रहिले
गोंदिया : लग्नसमारंभ आटोपल्यानंतर मोटारसायकलने स्वगावी दासगाव सितुटोला येथे जाणाऱ्या मोटारसायकलला भरधाव टिप्परने धडक दिल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१) सकाळी ११.३० वाजता रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागवतटोलाजवळ घडली.
आदित्य कुमेंद्र बिसेन (७), कुमेंद्र बुधराम बिसेन (३७) रा. सितूटोला दासगाव व आर्वी कमलेश तूरकर (५ ) रा. इंदिरानगर पिंडेकपार असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. मोहीत कुमेंद्र बिसेन (९) व माहेश्वरी कुमेंद्र बिसेन (३०) दोन्ही सितूटोला दासगाव असे गंभीर जखमी असलेल्या मायलेकांची नावे आहेत. गोंदिया तालुक्यातील पिंकेपार येेथे लग्न सोहळ्याकरिता शनिवारी बिसेन कुटुंबीय दासगाववरून मोटारसायकलने आले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर दासगाव येथे मोटरसायकल सीजी ०४ सीएस ५७५५ ने जात असताना ढाकणी ते भागवतटोला या रस्त्यावर टिप्पर एमएच ३ के ०२९८ ने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक ऐवढी जोरदार हाेती की त्या धडकेत घटनास्थळी तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानानंतर ट्रक चालक घटना स्थळावरून पळ काढला. दरम्यान या घटनेची माहिती रामनगर पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर टिप्पर चालकाविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू बस्तवाडे करीत आहेत.
एकाच दुचाकीवर पाच लोक
लग्न समारंभातून एकाच मोटारसायकलवर पती-पत्नी व तीन चिमुकले असे पाच जण दासगावकडे जात असतांना भरधाव टिप्परने त्यांना धडक दिली. यात मुलगा व वडीलाचा मृत्यू झाल्याने बिसेन कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दुचाकीवर बसून प्रवास करतांना दोन पेक्षा अधिक लोकांनी बसून प्रवास करू नये.
माहेश्वरीने फोडला हंबरडा
टिप्परने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत डोळ्यादेखत पती कुमेंद्र बिसेन व मुलगा आदित्य बिसेन व तर बहिणीच्या मुलीचा मृत्यू झाला. तर माहेश्वरी देखील जखमी झाली. पण या अवस्थेत पती आणि मुलांना वाचविण्यासाठी घटनास्थळी धडपडत होती. पती आणि मुलाचा मृत्यू झाल्याचे तिला कळताच तिने हंबरडा फोडला. हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांना सुध्दा अश्रू अनावर झाले होते.
आनंदाचे वातावरण क्षणात दुख:त बदलले
बिसेन कुटंबीय शनिवारी गोंदिया येथे कौटुंबीक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. विवाह सोहळ्यात सर्व नातेवाईकांच्या गाठीभेटी झाल्याने सर्व कुटुंबीय आनंदात होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर गावाकडे परतत असताना हा अपघात झाल्याने आनंदाचे वातावरण क्षणातच दुख:त बदलले.
भरधाव टिप्पर किती बळी घेतील?
गोंदिया जिल्ह्यात बहुतांश टिप्परच्या अपघातात लोकांचा जीव गेला आहे. चोरीची रेती चोरी करतांना अधिकाऱ्यांनी पकडू नये या भितीपोटी रस्त्याने सुसाट टिप्पर वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे निष्पाण लोकांचा बळी जात आहे. याकडे पोलीस विभाग व महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.