तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वलाचा हल्ला; तीन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 05:06 PM2022-05-19T17:06:16+5:302022-05-19T17:09:59+5:30
हे तिन्ही मजूर गुरुवारी सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी गावालगत असलेल्या जंगलात गेले होते.
इसापूर (गोंदिया) : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या तीन मजुरांवर एका अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठगाव वनपरिक्षेत्रांतर्गत डोंगरगाव जंगल परिसरात घडली.
बुधराम उईके, समीर उईके, राजीराम उईके (रा. डोंगरगाव) अशी अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मजुरांची नावे आहेत. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम सुरू आहे. ग्रामीण भागातील अनेकजण कुटुंबासह पहाटेपासून जंगलात तेंदूपत्ता तोडणीसाठी जातात. डोंगरगाव येथील हे तिन्ही मजूर गुरुवारी सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी गावालगत असलेल्या जंगलात गेले होते.
डोंगरगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १०३२मध्ये तेंदूपत्ता तोडत असताना त्यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला केला. यावेळी तिघांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळील मजूर धावून आल्याने अस्वलाने तिथून पळ काढला. यावेळी इतर मजुरांनी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मजुरांना केशाेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे या मजुरांवर उपचार सुरू असून, या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.