विद्युत प्रवाहीत करुन तीन बिबट्यांंची शिकार, चार आरोपींना अटक
By अंकुश गुंडावार | Published: August 29, 2023 03:32 PM2023-08-29T15:32:31+5:302023-08-29T15:35:04+5:30
देवरी तालु्क्यातील वडेगाव येथील घटना
देवरी (गोंदिया) : तालुक्यातील एफडीसीएमच्या वनक्षेत्रात वडेगाव शेजारील जंगलात रानडुकराचा शिकारीसाठी सोडलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने तीन बिबट्यांचामृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२८) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी वनविभागाने चार आरोपींना अटक केली असून आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार देवरी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरगाव बीट मधील एफडीसीएमच्या वनक्षेत्रातील गट क्रमांक ४८१ मध्ये शिकाऱ्यांनी रानडुकराच्या शिकारीसाठी विद्युत तारा लावून त्यात वीज प्रवाहीत केली होती. या तारांचा स्पर्श मादा बिबट व तिच्या दोन बच्छड्यांना झाल्याने तिन्ही बिबट्यांचा जागीच मृत्यू झाला. हे बिबट मृतावस्थेत गावकऱ्यांना आढळल्यानंतर त्यांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान सुरुवातीला गावकऱ्यांना घटनास्थळी दोन बिबट मृतावस्थेत आढळले होते.
वन विभागाच्या चमूने घटनास्थळी पोहचून तपासाला सुरुवात केली. रात्रभर तपास करुन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकूण आठ संशयित ताब्यात घेतले. त्यातील चार आरोपींनी विद्युत प्रवाहित तारा लावल्याची कबूली दिली. या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता तीन बिबट्यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले. त्या आधारावर मंगळवारी (दि.२९) पहाटे तिसऱ्या बिबट्याचा शोध घेण्यात आला. घटनास्थळापासून काही अंतरावरच तिसऱ्या बिबट्याचा मृतदेह आढळला. आरोपींनी २६ ऑगस्टला विद्युत तारा लावल्याचे वन विभागाला सांगितले असले तरी घटनास्थळावरील तिन्ही बिबट कुजलेल्या अवस्थेत असल्याने या घटनेला सहा ते सात दिवस झाले असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक वण्यजीव जी.एस.राठोड, देवरी उत्तर क्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी धात्रक, दक्षिण क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी चीडे यांनी आपल्या स्टाफसह सोमवारच्या रात्रीपासूनच घटनास्थळी ठाण मांडलेले होते. वनविभागाने पशुधन चिकित्सकांना पाचारण करून तिन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन करून त्यांना घटनास्थळी जाळण्यात आले.
बिबट्यांच्या शिकारीचे चार आरोपी अटकेत
विद्युत प्रवाहित तारांच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागातील अधिकाऱ्यांनी त्या क्षेत्रातील मैताखेडा, भोयरटोला व शिलापूर येथील आठ संशयित लोकांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केली असता रानडुक्करांच्या शिकारीसाठी वडेगाव जंगल परिसरात विद्युत प्रवाहित केल्याची कबुली चार आरोपींनी दिली. यात अरुण शामराव राऊत (३५) रा. भोयरटोला, देवराम गणेश मानकर (४५) रा. मैतेखेडा, दशरथ बुधराम धानगाये, रा. भोयरटोला, रामचंद्र गावड ४५ मैतेखेडा यांनी गुन्हा कबूल केला. तर अन्य पाच जणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले.
त्या बिबट्यांचा मृत्यू सात दिवसांपूर्वीच
वन्य जीवांचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या वनविभागाकडे आहे त्या वनविभागातीलच अधिकारी व त्यांच्या अखत्यारीतील वनरक्षक जंगलात फिरत नसल्याने शिकाऱ्यांना रान मोकळे झाले आहे. यातच सात दिवसापूर्वी तीन बिबटयांचा विद्युत धक्क्याने मृत्यू होतो आणि त्याची माहिती सात दिवसानंतर २८ ऑगस्टला वन विभागाला माहिती मिळते यातूनच हे लक्षात येते. विशेष म्हणजे या तिन्ही बिबट्यांचे मृतदेह हे सडलेल्या स्थिती होते. त्यामुळे त्यांचा सात दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.