तीन बाजार समित्यांचे ‘इलेक्शन’

By admin | Published: July 6, 2015 01:24 AM2015-07-06T01:24:09+5:302015-07-06T01:24:09+5:30

जिल्ह्यातील सात पैकी तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांची पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.

Three 'market' committees 'election' | तीन बाजार समित्यांचे ‘इलेक्शन’

तीन बाजार समित्यांचे ‘इलेक्शन’

Next

गोंदिया : जिल्ह्यातील सात पैकी तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांची पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. यात आमगाव, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी येथील बाजार समितीचा समावेश आहे. या तिन्ही बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येथील निवडणुकीच्या राजकारणाला सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यात निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. लोकसभा, विधानसभा त्यानंतर नुकतेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. तर ग्राम पंचायतींच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या या निवडणुकांसोबतच सहकारी संस्थांच्याही निवडणुका जोमात सुरू असून जिल्ह्यात निवडणुकीचा हंगाम चांगलाच रंगात आलेला आहे.
निवडणुकीच्या धामधुमीला अधिक रंगतदार बनविण्यासाठी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका येत आहेत. जिल्ह्यात सालेकसा तालुका सोडून उर्वरीत सातही तालुक्यांत कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. या सात बाजार समित्यांमधील तीन बाजार समित्यांची निवडणूक आॅगस्ट महिन्यात होणार आहे. यात आमगाव, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी बाजार समितीचा समावेश आहे.
यातील आमगाव बाजार समितीच्या संचालकांचा कार्यकाळ २० आॅगस्ट २०१३ रोजी संपला आहे. सडक-अर्जुनी बाजार समितीचा कार्यकाळ ५ नोव्हेंबर २०१४ रोजी तर अर्जुनी-मोरगाव बाजार समितीचा कार्यकाळ १४ मार्च २०१५ संपला आहे. या तिन्ही बाजार समित्यांच्या निवडणुका जिल्हा उप निबंधकांच्या मार्फत घेण्यात येणार असून त्यांचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर झालेला आहे. जिल्ह्यातील वजनदार बाजार समित्यांत या तिन्ही बाजार समित्यांचा समावेश होत असल्याने येथील निवडणुकीला घेऊन आतापासूनच राजकारणाला रंगत चढू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)
पहिल्या आठवड्यापासूनच निवडणूका
आॅगस्ट महिन्यात तिन्ही बाजार समित्यांच्या निवडणुका होणार असून सुरूवातीपासूनच त्यांना तारखा देण्यात आल्या आहेत. यात सर्वप्रथम आमगाव बाजार समितीचा नंबर असून २ आॅगस्ट रोजी येथे निवडणूक होणार आहे. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी अर्जुनी-मोरगाव बाजार समितीची निवडणूक घेतली जाणार आहे. तर सर्वात शेवटी २३ आॅगस्ट रोजी सडक-अर्जुनी बाजार समितीची निवडणूक होणार आहे.
आमगावात आले १०६ अर्ज
बाजार समिती संचालकपदासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीतील आमगाव बाजार समितीकरिता अर्ज टाकण्याचा शेवटचा दिवस २३ जून देण्यात आलेला होता. त्यामुळे आता अर्ज टाकण्याची मुदत निघून गेली असून आमगाव बाजार समितीत शेवटच्या दिवसापर्यंत इच्छुकांकडून १०६ अर्ज आले असल्याची माहिती आहे. शिवाय अर्जुनी-मोरगाव बाजार समितीसाठी १० जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील. तर सडक-अर्जुनी बाजार समितीचा १५ जुलै अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक आहे.
चार समित्यांवर प्रशासक नियुक्त
जिल्ह्यत सात बाजार समित्या आहेत. यातील आमगाव, तिरोडा, सडक-अर्जुनी व देवरी या चार बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील तिरोडा बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचारामुळे तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्याची माहिती आहे. तर गोंदिया, गोरेगाव व अर्जुनी-मोरगाव येथे प्रशासक नसून तेथे अध्यक्ष कार्यरत आहेत.

Web Title: Three 'market' committees 'election'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.