पानगावात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:57+5:302021-04-28T04:31:57+5:30
शहरी भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्गामुळे महामारीचे स्वरूप आले आहे. आता याचा शिरकाव तीव्र गतीने ग्रामीण भागातसुद्धा होत असताना ...
शहरी भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्गामुळे महामारीचे स्वरूप आले आहे. आता याचा शिरकाव तीव्र गतीने ग्रामीण भागातसुद्धा होत असताना दिसत आहे. पानगावव्यतिरिक्त इतर गावांमध्येसुद्धा काही लोकांनी मृत्यूला कवटाळले आहे. अशात ग्रामीण भागातील जनतेलासुद्धा सावधतेने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. पानगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला. त्यामध्ये प्रौढ वयातील दोन सख्खे भाऊ आणि त्यांची म्हातारी आई यांचा समावेश असून, कुटुंबातील इतर सदस्यांची प्रकृतीसुद्धा खालावलेली आहे. तसेच गावात इतर लोकांनासुद्धा ताप व इतर आजारांचा त्रास वाढला आहे. आरोग्य विभागातर्फे ग्रामपंचायतीला औषधे देऊन गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. दरम्यान, सालेकसाचे तहसीलदार कांबळे, ठाणेदार प्रमोद बघेले व अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली व गावकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
बॉक्स
मृतदेहासाठी आवश्यक साहित्याचा अभाव
कोरोना काळात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाला प्लास्टिक पिशवीत गुंडाळून अंत्यसंस्कारासाठी नेले जाते. परंतु, आरोग्य विभागाने प्लास्टिक पिशवीचा पुरवठा केला नाही. त्यामुळे पिशवीत न गुंडाळता दफनविधी करण्यात आला. अशात कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.