नऊ देशातील पाहुण्यांचा तीन महिने गोंदियात मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:25 PM2019-02-04T22:25:13+5:302019-02-04T22:26:04+5:30
जिकडे-तिकडे तलावांची संख्या कमी होत चालल्याने पक्ष्यांचे खाद्य कमी होत आहे. परिणामी तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नऊ देशातील विदेशी पाहुणे (पक्ष्यांचा) तब्बल तीन महिने मुक्काम असतो. यंदाही या पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी दरवर्षी या पक्ष्यांची संख्या रोडावत चालली असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिकडे-तिकडे तलावांची संख्या कमी होत चालल्याने पक्ष्यांचे खाद्य कमी होत आहे. परिणामी तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नऊ देशातील विदेशी पाहुणे (पक्ष्यांचा) तब्बल तीन महिने मुक्काम असतो. यंदाही या पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी दरवर्षी या पक्ष्यांची संख्या रोडावत चालली असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यात सायबेरीया, मंगोलीया, पाकीस्तान, लद्दाख, श्रीलंका, नेपाळ, बलुचिस्तान, स्कॉटलँड, बांग्लादेश आदी देशातून बारहेडेड गुल, ग्रेलेगगुज, ब्राम्हणी सेलडक, कॉमन सेलडक, कोंबडॅक, कॉटनटेल, गडवाल, मालार्ड, स्पॉटबिलडक, नॉर्दन शॉव्हलर, नॉर्दन पिंटेल, गार्गेनी, कॉमन टेल, रेडक्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, ग्रेहेडेड लॅपविन इत्यादी पक्षी येतात. जिल्हा पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या तलावांमध्ये पक्ष्यांना आवडते खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असा तीन महिने मुक्काम विदेशी पक्ष्यांचा गोंदिया जिल्ह्यात असतो. बऱ्याच तलावांमध्ये अतिक्रमण झाले आहे. तसेच त्या तलावातील गाळ काढण्याच्या नावावर पक्ष्यांचे खाद्य संपविण्यात येत आहे. त्यामुळे विदेशी पक्ष्यांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. मात्र यानंतरही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यातील मोजक्या तलावांची स्थिती बरी असल्यामुळे त्या तलावांकडे स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन नेहमीच होत असते. जिल्ह्यात हजारो तलाव आहेत. परंतु फक्त पाचच तलावांवर पक्ष्यांचा महाकुंभ दिसून येतो. उर्वरीत तलावांवर पक्षी भटकत नाहीत. याचाच अर्थ जिल्ह्यातील इतर तलावांची स्थिती पक्ष्यांसाठी अनुकूल नाही.
पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी हे करा
पक्ष्यांचे आवडते खाद्य तलावाच्या काठावर पावसाळ्यात लावावे, ज्या ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास आहे त्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे, त्या पक्ष्यांचे निरीक्षणासाठी जातांनाही दूरूनच निरीक्षण करावे, पक्षी विचलीत होणार नाही याची काळजी घ्यावी,शेकºयांनी पावसाळा संपतांना तलावातील पाणी शेतात नेण्यासाठी पाळ फोडतात ते फोडू नये, तलावातील सदासावली, काटेकोळसा हे पक्ष्यांना त्रास देणाºया वनस्पती नष्ट करावेत.
शिकाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त वाढवा
तलावांवर येणाऱ्या देशी, विदेशी पक्ष्यांची फासे लावून, विष टाकून शिकार केली जाते. ती शिकार होऊ नये यासाठी वनविभाग व वन्यप्रेमींनी गस्त घालण्याचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे तलावांवर होणारी शिकार थांबेल. ही शिकार थांबविण्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी.
दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी-कमी होणे ही धोक्याची घंटा आहे. यासाठी फक्त वन्यजीव व वनविभागावर अवलंबून न राहता गावातील पक्षीप्रेमींनी आपले कर्तव्य समजून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करावा. पक्ष्यांचे अन्न व अधिवास टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
- मुकूंद धुर्वे, मानद वन्यजीवरक्षक तथा
संवर्धन अधिकारी सातपुडा फांऊडेशन गोंदिया.