‘स्वाईन फ्लू’ने तीन जण दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:12 PM2017-09-25T22:12:19+5:302017-09-25T22:12:42+5:30
संसर्गजन्य असलेल्या स्वाईन फ्लूने आतापर्यंत तिरोडा तालुक्यातील तीन जण दगावले.
हितेश रहांगडाले। लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : संसर्गजन्य असलेल्या स्वाईन फ्लूने आतापर्यंत तिरोडा तालुक्यातील तीन जण दगावले. तर एक संशयित रुग्ण आढळला. यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिरोडा तालुक्यातील केसलवाडा, बिर्सी व चांदोरी येथे स्वाईन फ्लू ने तीन जण २४ सप्टेंबर रोजी दगावल्याची माहिती आहे. यामध्ये सरस्वता बाजीराव रार्घोते (५३) बिर्सी, दिलीप बाबूराव आदमने (४०) रा. चांदोरी व सुनिता अभिमन कुकडे (५५) रा.केसलवाडा यांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूमुळे एकाच तालुक्यातील तीन जण दगावल्याची गोंदिया जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील बिर्सी येथील स्वाईन फ्लूचा पहिला बळी ठरलेली महिला सरस्वता बाजीराव रार्घोते (५५) हिला २० सप्टेंबर साधा ताप आला होता. त्यावेळी आरोग्य उपकेंद्र लखेगाव येथून तिला औषधी देण्यात आले होते. परंतु दुसºया दिवशी श्वास घेण्याचा त्रास वाढल्यामुळे प्रथम तिरोडानंतर भंडारा व नागपूर येथील रुग्णालायात दाखल करण्यात आले.
नागपूर येथे ताप कमी न झाल्यामुळे २३ सप्टेंबरला सरस्वता हिला शासकीय रुग्णालय नागपूर येथे दाखल करण्यात आले. तेथे सदर रुग्ण स्वाईन फ्लूने ग्रस्त असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर औषधोपचार करण्यात आला. परंतु २४ सप्टेंबर रोजी सरस्वता रार्घोते यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. चांदोरी येथील दिलीप बाबूराव आदमने (४०) याला सुद्धा सामान्य ताप होता. त्याला १९ सप्टेंबर रोजी भंडारा व नंतर नागपूर दाखल करण्यात आले. परंतु २३ सप्टेंबर रोजी त्यांचा सुद्धा शासकीय रुग्णालय नागपूर येथे स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.
तिसरा बळी केसलवाडा येथील सुनीता अभिमन कुकडे (५५) असून तिला १० सप्टेंबरपासून ताप होता. २४ सप्टेंबर रोजी भंडारा येथील खासगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. स्वाईन फ्लूने दगावलेली सरस्वता रार्घोते हिचा नातू नयन नंदकिशोर रार्घोते (२) बिर्सी हा संशयीत रुग्ण म्हणून आढळला असून त्याला डॉ. अग्रवाल यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आरोग्य कर्मचाºयांना सहकार्याचे आवाहन
तिरोडा तालुक्यात एकाचवेळी स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण दगावल्याच्या घटनेने जनतेत भीतीचे वातावरण आहे. यामुळे जनतेने घाबरुन न जाता आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पाटील यांनी केले आहे. बिर्सी, गुलाबटोला, लाखेगाव येथील सर्वेक्षण करण्यात आले असून जनतेत जनजागृती करण्यात असल्याचे सांगितले.
स्वाईन फ्लूची लक्षणे
कुणालाही ताप, सर्दी, खोकला असणे, ताप तीव्र होणे, सर्दीमुळे घसा दुखणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही स्वाईन फ्लू या रोगाची प्राथमिक लक्षणे आहे. याकडे कानाडोळा न करता काळजीपूर्वक औषधोपचार करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
तिरोडा तालुक्यात दगावलेले तिन्ही रुग्ण हे स्वाईन फ्लूमुळे दगावल्याचे रक्त तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग असून यावर ठराविक उपचार नसून प्रतिबंध हाच उपाय असल्याचे सांगितले. यासाठी जनतेने गर्दीच्या ठिकाणी वावरणे टाळावे, तापाची लक्षणे आढळल्यास तात्काळ औषधोपचार करावे.
-डॉ.सी.आर.टेंभुर्णे
तालुका वैद्यकीय अधिकारी