मोटारपंप चोरणाऱ्या टोळीतील तिघे जण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By नरेश रहिले | Published: March 10, 2024 06:50 PM2024-03-10T18:50:30+5:302024-03-10T18:51:18+5:30
शेतकऱ्यांनी शेतात धानपिकाला पाणी देण्यासाठी लावलेल्या मोटार पंपांना टार्गेट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे.
गोंदिया: शेतकऱ्यांनी शेतात धानपिकाला पाणी देण्यासाठी लावलेल्या मोटार पंपांना टार्गेट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. पथकाने या टोळीतील तिघांना अटक केली असून ही कारवाई शनिवारी (दि.९) करण्यात आली. त्या आरोपींजवळून एक लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चोरी, घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा तसेच मोटारसायकल व मोटारपंप चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्हा पोलिसांना दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात वाढती चोरी, घरफोडीचे प्रमाण पाहता विशेषतः मोटारसायकल व मोटारपंप चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रयत्न करीत आहे. यासाठी पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथक तयार केले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे गुन्हेगारांची माहिती काढण्याचे काम सुरू असतानाच गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी मोटारपंप चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार जितेंद्र रुपचंद पटले (३५), आकाश राधेश्याम पटले (२७), रुपेश रमेश उके (३३, तिघे रा. धादरी, ता. तिरोडा) यांना ताब्यात घेतले. विचारपूस केली असता तिघांनी आपला गुन्हा कबूल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक लबडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, हवालदार इंद्रजित बिसेन, सुजित हलमारे, शिपाई संतोष केदार, चालक पोलिस शिपाई घनश्याम कुंभलवार यांनी केली आहे.
आठ मोटारपंप व एक मोटारसायकल जप्त
मोटारपंप चोरी प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली व त्यानंतर त्यांची अधिक तपास सुरू केला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी जितेंद्र पटले याच्याकडून चार मोटारपंप किंमत २९ हजार रुपये, तसेच आकाश पटले याच्याकडून चार मोटारपंप व एमएच ४०-एस २९१२ क्रमांकाची मोटारसायकल असा ८७ हजार रुपयांचा माल असा एकंदर एक लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त केला.
दोन महिन्यांपासून पोलिस होते मागावर
तिरोडा तालुक्यातील ग्राम सालेबर्डी, धादरी, उमरी, सरांडी व तिरोडा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज मोटारपंप चोरीच्या घटना मागील दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात घडत होत्या, यामुळे स्थानिक गुन्हे शाखा मागील दोन महिन्यांपासून त्याकडे बारकाईने नजर ठेऊन होते. अशातच गुप्त माहिती व पथकाच्या प्रयत्नाने टोळीचा पर्दाफाश करता आला.