गोंदियात स्वच्छतेचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 06:00 AM2019-10-31T06:00:00+5:302019-10-31T06:00:14+5:30

व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात दिवाळीची खरेदी झाली. त्यामुळे कापड दुकानांमधून निघणारा कचरा असो की लक्ष्मीपूजनासाठी केळीचे खांब, पाने, तोरणासाठी आंब्याची पाने विकणाऱ्यांनी शिल्लक राहिलेल्या मालाचा कचरा असो, प्रत्येक चौक व रस्ता या कचऱ्यांनी माखून गेला आहे. त्यामुळे शहरात गेल्या चार दिवसांपासून साफसफाई झालीच नाही की काय, अशी शंका येत आहे.

Three-thirds of cleanliness in Gondia | गोंदियात स्वच्छतेचे तीनतेरा

गोंदियात स्वच्छतेचे तीनतेरा

Next
ठळक मुद्देऐन दिवाळीतही अस्वच्छता : मार्केट परिसरासह सर्वच रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळीची चाहूल लागली की सर्वांना वेध लागतात ते साफसफाई आणि रंगरंगोटीचे. घराच्या कानाकोपºयातील धूळ साफ करून लक्ष्मीच्या आगमनासाठी घर सज्ज केले जाते. पण गोंदिया नगरपालिका किंवा येथील व्यापारी वर्गाचा स्वच्छतेशी दूरदूरपर्यंत काही संबंधच नसल्याचा प्रत्यय बुधवारी शहरातील रस्त्यांवरून फेरफटका मारताना येत होता. रस्त्यांवर विखुरलेला, कडेला ढीग लावून ठेवलेला, अर्धवट जळालेला आणि चक्क अनेक चौकांची ‘शान’ वाढविली जाईल, अशा पद्धतीने चौकाच्या दर्शनी भागात लावून ठेवलेला कचरा बहुतांश सर्वच मार्गावर पडून असलेला दिसला.
व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात दिवाळीची खरेदी झाली. त्यामुळे कापड दुकानांमधून निघणारा कचरा असो की लक्ष्मीपूजनासाठी केळीचे खांब, पाने, तोरणासाठी आंब्याची पाने विकणाऱ्यांनी शिल्लक राहिलेल्या मालाचा कचरा असो, प्रत्येक चौक व रस्ता या कचऱ्यांनी माखून गेला आहे. त्यामुळे शहरात गेल्या चार दिवसांपासून साफसफाई झालीच नाही की काय, अशी शंका येत आहे. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे ही कल्पना गोंदियावासीयांसाठी कायम दिवास्वप्नच ठरली आहे. दिवाळीची तयारी करताना सर्वात आधी घरा-दाराची साफसफाई होते. जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी नांदते, असे म्हटले जाते. पण गोंदिया शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरले आहे. त्यामुळेच की काय, गोंदिया नगर परिषदेवर लक्ष्मी नाराज असून गेल्या काही वर्षात नगर परिषदेची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. दररोज कोट्यवधी रुपयांची व्यापारी उलाढाल होणाºया या शहराची ही दुरवस्था शहराच्या विद्रुपतेत भर घालत आहे.
अगदी बाराही महिने अस्वच्छता आणि तुंबलेल्या नाल्यांसाठी कुप्रसिद्ध असणाºया गोंदियात अधूनमधून नगर परिषद स्वच्छता मोहीम राबवून बऱ्यापैकी साफसफाई करते. मात्र तीन-चार दिवसातच परिस्थिती ‘जैसे थे’ होते. वास्तविक कार्यालयाला सुट्या असल्या तरी स्वच्छता विभागाला मात्र सुटीवर जाता येत नाही. शहराची स्वच्छता दररोज करणे गरजेचे असते. पण नगर परिषद प्रशासनाने गोंदियावासीयांना अक्षरश: कचऱ्यात ढकलून स्वच्छतेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे.

मुख्याधिकारी अनभिज्ञ, पदाधिकारी बिनधास्त
दिवाळीच्या सुट्यांसाठी आपल्या गावी गेलेले मुख्याधिकारी याबाबत अनभिज्ञ होते. दिवाळीच्या सुट्यांमुळे ही परिस्थिती उद्भवली असण्याची शक्यता वर्तवून उद्याच शहरातील कचरा उचलण्याची निर्देश देणार असे सांगितले. अधिकारी आपल्यापरीने काम करीत असले तरी नगर परिषदेतील पदाधिकारी हे स्थानिक रहिवासी असताना त्यांना शहराचे हे विद्रुप रूप कसे पहावले जाते, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून नेहरू चौकापासून दुर्गा मंदिर चौकापर्यंत आणि गांधी चौकापासून तर श्री टॉकीज चौकापर्यंतच्या रस्त्यांवरील दुकानांमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी काहीशी गर्दी केली होती.
नागरिकांच्या गर्दीत रस्ते दिसतच नसल्यामुळे रस्त्यावर किती कचरा साचलेला आहे याची कल्पनाच येत नव्हती. मात्र बुधवारी (दि.३०) खरेदीचा जोर कमी झाल्यानंतर संपूर्ण रस्त्यावरील चित्र उघड झाले.
विविध वस्तूंच्या दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूची पॅकिंग असणारे पुठ्ठे, प्लास्टिकचे कव्हर, कागदी कव्हर, छोट्या कॅरीबॅग असा कितीतरी प्रकारचा कचरा रस्त्यावर साचलेला दिसत होता. विशेष म्हणजे रस्त्यावर नागरिकांनी टाकलेला हा कचरा कमी होता म्हणून की काय प्रत्येक दुकानदाराने दुकानातून निघालेल्या कचºयाचा ढिग दुकानासमोरच लावून ठेवलेला दिसत होता.
लक्ष्मीपूजनानिमित्त चौकाचौकात विक्रीसाठी केळीचे खांब विक्रीसाठी आले होेते. शिल्लक राहिलेल्या पानांचा आणि खांबांचा कचरा नेहरू चौक, आंबेडकर चौक, हनुमान मंदिर चौक, जयस्तंभ चौक अशा अनेक चौकांमध्ये तसाच पडून होता.
विसरले स्वच्छतेची शपथ मंगळवारी लक्ष्मीपूजनानिमित्त शहराच्या नेहरू चौक, हनुमान चौक, मनोहर चौक, जयस्तंभ चौकासह इतर काही भागात केळीचे खांब, पाने आणि झेंडूच्या फुलांची दुकाने लागली होती. सायंकाळपर्यंत विक्री करून शिल्लक राहीलेली केळीची पाने, खांब, तसेच फुलांचा कचरा तिथेच टाकून विक्रेते आपापल्या गावी रवाना झाले. त्यामुळे तो कचरा जिकडे-तिकडे विखुरलेला दिसत होता.
गांधी जयंतीनिमित्त प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबवून कर्मचाºयांना स्वच्छता राखण्याची शपथ देण्यात आली. मात्र गोंदिया नगर परिषदेवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

Web Title: Three-thirds of cleanliness in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.